उपासनेचे मंत्र
aikya group
Tuesday, August 03, 2010 AT 12:23 AM (IST)
अंत:करणापासून निघालेली उपासनाच परिणाम-कारक होते. गळ्याच्या वरून निघालेले म्हणजे नुसते तोंडाने म्हटलेले उपासनेचे मंत्र म्हणजे निवळ थट्टा आहे आणि परमेश्वराला खोटा पाडण्यासारखे आहे. चित्ताची जशी अवस्था तशी उपासनेची तऱ्हा किंवा तेज.
विद्यार्थ्यांची प्रार्थना
(क) ये त्रिषप्ता: परियन्ति विश्वारुपाणि बिभ्रत:
वाचस्यातिर्बला तेषा तम्वो अद्य दधातु मे।।
पुनरेहि वाचस्पते देवेन मनसा सह।
वसोस्पते निरमय मय्येवास्तु मयि श्रुतम्।।
इहैवामिव तनूभे अर्त्नी इवज्यया।
वाचस्पतिनिर्यच्छतु मय्येवास्तु मयि श्रुतम्।
उपहूतो वाचस्पतिरुपास्मान् वाचस्पतिर्व्हयताम्।
संश्रुतेन गमे महिमा श्रुतेन विराधिषि।।
(अथर्ववेद कांड 1. अ. 1 सू.1)
अर्थ : हे वाचस्पते, जे तीन गुण आणि सात पदार्थ नाना रुपे धारण करून व्यापून राहिले आहेत त्यांचे बल माझे ठायी स्थापित कर. हे वाचस्पते, पुन: दिव्य मनाने ये, हे वसोस्पते, मला आनंदित कर. माझे ज्ञान तुझे ठायी स्थिर होवो. धनुष्याची दोन्ही टोके एका दोरीने ताणलेली असतात, तुझे गुरुशिष्य दोघे सज्ज असोत. गुरु नियमाने चालो, आणि ज्ञान माझे ठायी स्थिर होवो. वाचस्पतीला आम्ही बोलावले, तो आम्हाला बोलवो, आम्ही सर्वांनी ज्ञानयुक्त होऊन ज्ञानाशी कधीही विरोध करू नये. या प्रार्थनेत वाचस्पतीरुपी ब्रह्माचे ध्यान सांगितले आहे. लोखंड अग्नीत घातले असता त्यात अग्नीचे गुण येतात. त्याप्रमाणे वाचस्पतीरुप सर्वव्यापी चैतन्याशी आमच्या बुध्दीचे काही काळ तादात्म्य झाल्यावर तिच्यात अद्भुतशक्ती का येणार नाही?
कोणताही मंत्र असो, तो नुसता पाठ करून व गाऊन थांबू नका. तर तो चांगला समजून घेऊन त्याच्या भावार्थाच्या ठिकाणी आपले मन लीन व शांत म्हणजे तल्लीन व तद्रूप करा.