Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

सच्चा उपासक
aikya group
Sunday, August 01, 2010 AT 12:56 AM (IST)
Tags: Vachanamrut,  
भाई, खरे सांगतो की, उपासक किंवा भक्त होणे आपल्या नशीबीच नाही. साऱ्या दुनियेत एकच सच्चा उपासक मी पाहिला, इतर भक्त, ऋषी, मुनी, पीर पैगंबर आपणाला "प्रेममय उपासक' असे म्हणवीत असतात. पण ही एक बातच होय. हा सच्चा भक्त किंवा उपासक कोण? ज्याला आपण आपले उपास्य दैवत समजतो तोच. हे कसे? तर तो प्रियकराप्रमाणे आडून आडून सतावतो, हळूच चित्तवृत्तीचा पदर खेचतो, नाना प्रकारची रुपे व वेश धारण करून आमच्या अंगाच्या (अहंकाराच्या) पडद्यावर नेत्रांची चोच मारतो, अनात्म वस्तूच्या ठिकाणी आमचे मन लागताच तो इतका काही रुसतो की विचारु नका. भुवया वाकड्या व वर करुन क्रोधाचा कसा अविर्भाव आणतो. चित्तवृत्ती मार्गात अडल्या की तो चिमटे काढतो. जराही दम खाऊ देत नाही. रामनामाच्या निष्काम शय्येशिवाय इतर कुठेही क्षणभर नावालाही तो आराम पडू देत नाही.
जिवलगा, एकदा प्रियकर झाल्यावर आता रुसणे फुगणे का? रास चाखून झाल्यावर आता नटतोस काय? हे प्राणनाथ, इकडे पाहा, तो दुष्ट शिशुपाल पुढे सरला आणि तुमच्या स्वामिनीला घेऊन चालला. काही राग, चीड, अथवा शरम आहे की नाही? ही रुसण्याची वेळ नव्हे, लवकर या, धावा
त्वमसि मम भूषणं, त्वमसि मम जीवनं
त्वमसि मम जलधिरत्नम्‌।
भवतु भवतीह मयि सततमनुरोधिनास्तत्र
मम हृदयमतियत्नम्‌।। - जयदेव
अर्थ : तूच माझे भूषण, तूच माझे जीवन, तूच माझे रत्न, तुझ्या ठिकाणी अनुरक्त झालेले माझे हृदय तुझ्या ठिकाणी सतत जडलेले असो. सूर्याला बारा महिने फुकटच्या फुकट तेज व प्रकाश देतोस. मग मला अष्टौप्रहर निजानंद देत गेलास तर तू कंगाल होत नाहीस ना? हे प्रभो, आता माझ्याने दोन कामे निभावणार नाहीत. खाणे पिणे, कपडेलत्ते, घरदार यांच्याकडे लक्ष पुरवू की प्रियकराच्या मुखकमलाकडे टक लावून बसू?
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: