Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रिझर्व्ह बॅंक अधिकाऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी सातारा जिल्हा बॅंकेची निवड
aikya group
Friday, July 30, 2010 AT 03:04 AM (IST)
Tags: local
सातारा, दि. 29 : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, आरपीसीडी विभाग अधिकाऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी देशातील निवडलेल्या प्रमुख बॅंकांमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा समावेश करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, आरपीसीडी विभाग अधिकाऱ्यांनी जिल्हा बॅंकेस कामकाजाच्या अनुषंगाने भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत बॅंकेचेउपाध्यक्ष लालासाहेब शिंदे, संचालक शाहूराज फाळके, प्रकाश बडेकर यांनी केले. ही भेट प्रामुख्याने आर्थिक व्यवस्थापन आणि ताळेबंद विश्लेषण याकरिता होती. सहकारातील अग्रगण्य बॅंकेस भेट देण्याच्याउद्देशाने त्यांनी जिल्हा बॅंकेची निवड केली.
यावेळी लालासाहेब शिंदे म्हणाले, जिल्हा बॅंकेकडून रिझर्व्ह बॅंक आणि आरपीसीडी विभागाच्या अधिकाऱ्यांना पॉलिसी ठरविण्याच्यादृष्टीने उपयुक्त माहिती दिली जाईल. या बॅंकेचे संचालक मंडळ धोरण ठरविण्याशिवाय इतर कोणत्याही कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही धोरण ठरविताना विचार घेतला जातो.
नाबार्डचे जिल्हा प्रबंधक म्हणाले,जिल्हा बॅंकेचा डिस्ट्रीक्ट क्रेडिट प्लॅनमध्ये सर्वात मोठा वाटा आहे.
आरबीआयचे प्रोग्राम डायरेक्टर त्यागराजन म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेने पहिला ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या आरपीसीडी विभागाने अभ्यासासाठी सहकारातील निवडलेल्या बॅंकांपैकी जिल्हा बॅंकेचा अग्रक्रमाने समावेश आहे.
प्रोग्राम डायरेक्टर कुलकर्णी म्हणाले, सातारा जिल्हा बॅंक ही देशातील सर्वोत्कृष्ट बॅंक असून त्यांना सलग सहावेळा नाबार्डचा उत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार मिळाला आहे. या बॅंकेकडून सहकारातील बरीच उपयुक्त माहिती मिळेल व त्याचा इतर सहकारी बॅंकांना उपयोग व्हावा याचा विचार करुन आम्ही या बॅंकेची निवड केली आहे.
प्रारंभी बॅंकेचे सरव्यवस्थापक एस. एस. नलावडे, व्यवस्थापक डी.एफ. धरु, ए. बी. क्षीरसागर,उपव्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बॅंकेच्या ठेवी, कर्ज, वसुली, भागभांडवल, लाभांश, एनपीए, स्वयंसहाय्यता बचत गट, प्रशिक्षण केंद्र, शेतकरी ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीज, किसान क्रेडिट कार्ड, विविध ठेव व कर्ज योजना आदींची माहिती दिली. तसेच बॅंकेला नाबार्डकडून 2009-10 या वर्षाच्या लेखापरिक्षणात "अ' वर्गबाबतची माहिती दिली.

गावोगावी विकासाला चालना देणारी व्यक्तिमत्त्वे घडावित : पाटील
पिंपोडे बुद्रुक, दि. 29 : पिंपोडे गावचे सुपुत्र मधुकर कांबळे यांचे कार्य समाजहितैषी आहे. विशेषत: ग्रामीण भागात विकासाला चालना देण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती घडवण्यासाठी गावागावात त्यांच्यासारखी आदर्श व्यक्तिमत्वे घडावित, असे प्रतिपादन माजी खासदार व राज्य सहकारी बॅंकेचे संचालक लक्ष्मणराव पाटील यांनी केले.
पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगावचे सुपुत्र व माजी पोलीस उपायुक्त मधुकर कांबळे यांचा एकसष्टीपूर्ती सोहळा छत्रपती संभाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, छत्रपती संभाजी महाराज उद्योग समूह व ग्रामस्थांतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्य बॅंकेचे संचालक लक्ष्मणराव पाटील होते. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब सोळस्कर, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे, चेअरमन अशोकराव लेंभे, माजी चेअरमन सुरेशराव साळुंखे, राहुल घोटणे, जयंत घोटणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम झाला. त्यानंतर ग्रामस्थांना रोपांचे वाटप करण्यात आले. बी. बी. कांबळे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कै. सीमा (उषा) ज. घोटणे ग्रंथालयाचे उद्‌घाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना लक्ष्मणराव पाटील पुढे म्हणाले, विकास ही सतत चालणारी प्रक्रिया असून एक काम पूर्ण झाले की दुसरे काम समोर येते. त्याकरिता विकासकामांना गती देणारी व्यक्तिमत्वे समाजात निर्माण झाली पाहिजेत.
एकसष्टीपूर्ती सोहळ्यानिमित्त बोलताना कांबळे म्हणाले, जगामध्ये अनेक प्रकारचे ज्ञान विस्तारले आहे. हे ज्ञान मिळवण्यासाठी, ही संस्कृती वाढवण्यासाठी वाचनालय चळवळ उपयुक्त ठरत आहे. आजच्या तरुणांनी स्पर्धात्मक साहित्य वाचनावर भर देवून स्वत:च्या करिअरकडे लक्ष केंद्रित करावे. गावातील विकासकामासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.
कार्यक्रमात रामभाऊ लेंभे, सुरेशराव साळुंखे, बाळासाहेब सोळस्कर, अशोकराव लेंभे, विठ्ठलराव साळुंखे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास लक्ष्मणराव कदम, रावसाहेब लेंभे, विठ्ठलराव साळुंखे, दौलतराव लेंभे, शांताराम निकम, जितेंद्र कांबळे, शैलेंद्र कांबळे, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. रामभाऊ लेंभे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य बी. एच. निकम यांनी आभार मानले.
ग्रामपंचायतीतर्फे सत्कार
दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कांबळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सरपंच जयेंद्र लेंभे, उपसरपंच अर्जुन साळुंखे, विकास साळुंखे, सुरेश लेंभे, जनार्दन निकम, चंद्रकांत निकम, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि विविध मंडळांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: