"आधुनिक भारत' ग्रंथाचे आज प्रकाशन
aikya group
Friday, July 30, 2010 AT 03:03 AM (IST)
सातारा, दि. 29 : प्रा. व्ही. पी. तथा विश्वनाथ पवार व डॉ. एन. एस. तांबोळी लिखित "आधुनिक भारत' ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवार, दि. 30 रोजी दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते व संस्थेचे सचिव प्रा. जे. जी. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
शिक्षणाचे जे दहा गाभाभूत घटक आहेत त्यातील पहिला घटक "भारतीय स्वातंत्र्य चळवळ' हा आहे. त्याचबरोबर एम. पी. एस. सी; यु. पी. एस. सी. या स्पर्धा परीक्षा आणि इतिहास विषय घेवून सेट, नेट उत्तीर्ण होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून या ग्रंथाचे लेखन केले आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतील आधुनिक भारताबाबतचे पेपर्स यामध्ये समाविष्ट केले आहेत. हा 760 पृष्ठांचा ग्रंथ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना अर्पण केला आहे.
प्रा. पवार यांनी मराठ्यांचा इतिहास, आधुनिक जग, मुघलकालीन भारताचा इतिहास, अमेरिकेचा इतिहास, मराठी सत्तेचा उदय, मराठा सत्तेचा विस्तार आणि ऱ्हास, प्राचीन भारताचा इतिहास अशा अठरा ग्रंथांचे लेखन केले आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध वरिष्ठ महाविद्यालयांत अधिव्याख्याता म्हणून काम केले असून आजही ते छ. शिवाजी कॉलेज येथे कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य, सातारा इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक-सदस्य आदी पदांवर ते कार्यरत असून इतिहासामधील अनेक विषयांवर त्यांचे महाराष्ट्रभर व्याख्यानाचे कार्यक्रम आणि कथाकथनाचे कार्यक्रम झाले आहेत.