
सातारा, दि. 29 : काही लोकांच्या अवास्तव कल्पना असतील. "सुधारक'कारआगरकर यांचा काळ आणि सध्याचा काळ यामध्ये खूप फरक आहे. निरीश्वरवादाची आगरकरांची भूमिका खूपच क्रांतिकारी होती. समाज त्यावेळी कर्मठ होता. ज्याच्या अस्तित्वाचा काहीच पुरावा नाही, मग ती गोष्ट आहे हे विचारवादी, बुध्दिवादी मानणारच नाहीत. त्यामुळे जगात परमेश्वर नाही हे सिध्द होत असून ईश्वर नसल्याचे सत्य समाज स्वीकारत नाही, अशी खंत प्रसिध्द नाट्य, सिने अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी व्यक्त केली.
येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सभागृहात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते डॉ. श्रीराम लागू यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी डॉ. लागू आणि त्यांच्या पत्नी सौ. दीपाताई लागू यांची नाट्य, सिनेमा, नास्तिकता, सामाजिक काम, वैचारिकता, भूमिका, सहजीवन आदी मुद्यांवर मुलाखत घेतली. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. लागू बोलत होते. यावेळी सौ. सरोज पाटील, समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, आ. विलासराव पाटील उंडाळकर, प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. लागू म्हणाले, परमेश्वर अस्तित्वात नाही, असे ठामपणे सांगणारे माझ्यासारखे अनेक लोक या जगतात आहेत. त्यामुळे याबाबत एकटे माझेच कौतुक मला वाटत नाही. पाऊस पडतो, सूर्य पूर्वेलाच उगवतो, यापाठीमागे कोणती तरी शक्ती आहे. पण ती शक्ती दिसत नाही, अनाकलनीय आहे. त्यामुळे ती शक्ती म्हणजेच परमेश्वर असा विचार होवू लागला. आज या गोष्टीवर वाद घातले जात आहेत. जगात परमेश्वर नाही ही गोष्ट समाजाला दिसत असताना देखील यावर विचार सुरु आहेत. विचार सुरु आहेत म्हणून ठीक आहे,
विचार थांबले तर परमेश्वराचे वर्चस्व मानून लोक मेंढरासारखे जगू लागतील. कसलाही पुरावा जगाच्या पाठीवर कुठेही कधीही मिळाला नाही. ती गोष्ट आहे असे म्हणणे यापेक्षा मोठी अंधश्रध्दा कोणती असू शकेल?
मुलाचे नाव मुस्लीम ठेवण्याचे कारण विचारले असता डॉ. लागू यांनी समाजात जातीवाद, धर्मवाद आणि अंधश्रध्देवर तोफ डागली. ते म्हणाले, माझे नाव श्रीराम आहे. ते एका देवाचे नाव आहे. पण मी देव मानतच नसल्याने ते नाव बदलण्याचे कारणच नाही. मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन असा जातीभेद लोक का मानतात? आपल्या देशात हे चालले आहे तरी का? मी केवळ माणूस आहे आणि समाजात भेदभाव नसावा यासाठी मी माझ्या मुलाचे नाव मुसलमान ठेवले.
अभिनेत्याने ऍथलेट फिलॉसॉफर असले पाहिजे, म्हणजे काय? या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. लागू म्हणाले, गेली 50 वर्ष मी मराठी रंगभूमीवर आहे. मी आयुष्यभर नाटक केले. याबाबत मी समाधानी आहे मात्र याचे कारण मला सांगता येणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देणे खूप अवघड आहे. या प्रश्नाला मी ती परमेश्वराची इच्छा असे उत्तर देतो. कारण जिथे परमेश्वरच नाही, त्याला असेच उत्तर दिले पाहिजे. प्रत्येक नट हा ऍथलेट फिलॉसॉफर असलाच पाहिजे. त्याचे शरीर व्यायामाचे असले पाहिजे तर दुसऱ्या बाजूला त्याची बुध्दी तल्लख असली पाहिजे. असा नट होण्याचा मी नम्रपणे प्रयत्न केला. मी तिथे पोहोचलो असा माझा दावा नाही. मी त्याच्या कुठेपर्यंत पोहोचलो याचा विचार मी करतो, असे ते म्हणाले. 50 वर्ष रंगभूमीवर असलो तरी माझी अविस्मरणीय व्यक्तिरेखा मी सांगणे फार कठीण आहे. मला आवडली नाही अशी व्यक्तिरेखा मी कधीच स्वीकारली नाही.
संत गाडगेबाबांची भूमिका करण्यास मी प्रथम नकार दिला होता. मात्र त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर मला समजले, की गाडगेबाबा एक महान व्यक्ती होते. त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचा अभिनय करणे टाळण्याची मी खूप मोठी चूक केली. परंतु नंतर मी गाडगेबाबा साकारला. मात्र चित्रीकरण संपल्यानंतर मला खूप दु:ख वाटू लागले. कारण मला पुन्हा गाडगेबाबा जगता येणार नव्हते, असे डॉ. लागू यांनी चित्रपटाविषयी बोलताना सांगितले तर सामना मध्ये मला खऱ्या अर्थाने अभिनय करावा लागला. हिंदी चित्रपटात मला आव्हानात्मक भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीने मला न्याय दिला नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, डॉ. लागू यांच्यासोबत मी समाधानी असून त्यांच्या निरीश्वरतेच्या ठाम भूमिकेचा मला अभिमान वाटतो. मी गणेशोत्सवात गणपती घरी आणते. त्याला त्यांनी कधी विरोध केला नाही. ते कधीच आरतीला हजर रहात नाहीत. मात्र मोदक खाण्यास हजर रहात असल्याचे सौ. दीपाताई लागू यांनी यावेळी सांगितले.
निळूभाऊ जगातील अव्वल दर्जाचे अभिनेते होते...
प्रसिध्द अभिनेते निळू फुले यांच्याबाबत प्रकट करताना, त्यांच्याबद्दल मी एका वाक्यात बोलू शकणार नसल्याचे सांगून डॉ. लागू म्हणाले, निळूभाऊ एक्स्प्लेन करणे म्हणजे एक मोठा ग्रंथच उलगडणे आहे. तो माणूस आणि अभिनेता म्हणूनही असामान्य होता. अशी माणसं महाराष्ट्रात फार दुर्मीळ आहेत. ते माझे सहकारी म्हणून मी त्यांची स्तुती करतोय असे मुळीच नाही. मी जगभरातील रंगभूमी पाहिली आहे. जगातील अव्वल दर्जाचे नट मी पाहिले असून निळूभाऊ त्यातील एक होते. ते अत्यंत नम्र, बुजरे, माणूसघाणे होते म्हणून त्यांची प्रसिध्दी झाली नाही. रंगभूमीला लाभलेलं ते एक देणं होतं.