
नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : सचिन फलंदाजी करतो तेव्हा एखादा कलाकार "राग' सादर करत असल्याचा भास होतो. क्रिकेटचा हा खराखुरा लीजंड भारतरत्न किताबासाठी पात्र आहे, असे मत 75 वर्षीय महान पार्श्वगायिका आशा भोसले यांनी व्यक्त केले.
मास्टर ब्लास्टर सचिनने श्रीलंकेविरुध्द कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकावून भारतीय संघाला संकटातून पार केले. त्यानंतर आशा भोसले पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, सचिन हा भारतरत्न किताबाला पात्र असल्याने त्याला हा किताब मिळायलाच हवा. त्याने दीर्घकाळ देशासाठी गौरवास्पद कामगिरी केली आहे. तो फलंदाजी करतो तेव्हा एखादा कलाकार राग सादर करत असल्यासारखे वाटते. फलंदाजीची शैली आणि दर्जा यामुळे तो इतरांपेक्षा वेगळाच आहे.
मी गॅरी सोबर्स, क्लाईव्ह लॉईड व व्हिव्हियन रिचर्डस् यांची फलंदाजी पाहिली आहे. मात्र सचिन हा एकमेवाद्वितीय आहे. त्याची शैली एकदम वेगळी असून कोणीही त्याची बरोबरी करू शकत नाही.
आशा भोसले यांनी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट लीसमवेत गाण्याचा अल्बम रेकॉर्ड केला आहे. त्यांची तेंडुलकरसमवेत गाण्याची इच्छा आहे. पण ही इच्छा फलद्रुप होईल की नाही याविषयी त्या साशंक आहेत. महान संगीतकार व आपले सासरे सचिनदेव बर्मन यांच्या नावावर तेंडुलकरचे नाव ठेवल्यामुळे आपल्याला तो नैसर्गिकरित्या जवळचा वाटतो. मला त्याच्यासमवेत गाण्याची इच्छा आहे. मात्र तो नेहमीच व्यस्त असल्याने हे घडेल असे वाटत नाही. पाहूया ही प्रतीक्षा कधी संपते ते, असे त्यांनी सांगितले.
सचिनने 2011 च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत नव्हे तर त्याला वाटेल तोपर्यंत खेळत रहावे. त्याचे क्रिकेटवर निरतिशय प्रेम असून त्याला खूप क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. त्याच्यामुळे मला या वयातही गात राहण्याची प्रेरणा मिळते.
तेंडुलकरच्या पराभव आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्याच्या प्रवृत्तीनेही मला प्रेरणा मिळते. कधी तो लवकर बाद होतो तर कधी मोठी खेळी करतो. ज्याला पराभवाची भीती वाटत नसेल तोच सचिन बनू शकतो, असे उद्गार त्यांनी काढले.