चाफळ येथील पर्जन्यमापन यंत्रणा नादुरुस्त
aikya group
Friday, July 30, 2010 AT 01:57 AM (IST)
चाफळ, दि. 29 : चाफळ परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसाची नोंद ठेवणारी पर्जन्यमापक यंत्रे नादुरुस्त अवस्थेत असल्याने पावसाची खरी नोंद मिळण्यास अडचणी येत आहेत. विद्यालयाच्या पटांगणावर असलेले पर्जन्यमापक अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तहलीलदार यांनी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.
चाफळ हा दुर्गम व डोंगराळ असा विभाग असल्याने याठिकाणी पावसाचे प्रमाण भरपूर असते. या पावसाची वेळोवेळी नोंद होणे गरजेचे आहे. यासाठी पर्जन्यमापक यंत्राचा वापर केला जातो. अशी पर्जन्यमापक यंत्रे चाफळमध्ये दोन, उत्तरमांड प्रकल्पावर एक व पाडळोशी येथे एक अशा अशा ठिकाणी आहेत. चाफळमधील यंत्र ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिले असून त्याच्या नोंदी घेतल्या जातात. मात्र ते मोकळ्या जागेत सपाट भागात ठेवले गेले नसल्याने पावसाच्या नोंदी सदोष होत आहेत. तर समर्थ विद्यालयाचे नारायण टेक याठिकाणी बसविण्यात आलेले पर्जन्यमापक नादुरूस्त स्थितीत असून याठिकाणच्या नोंदी कोण ठेवतो? याबाबत संभ्रमावस्था आहे. येथील पर्जन्यमापकाच्या सभोवताली तारेचे कुंपण असून सध्या गारवेलने कुंपणास वेढा दिला आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या कोऱ्या फलकांमुळे या पर्जन्यमापकाबाबत काहीच माहिती उपलब्ध होत नाही. याबाबतही योग्य कार्यवाही होणे गरजेचे आहे. याशिवाय उत्तरमांड मध्यम प्रकल्पावर कृष्णा खोरे महामंडळाने बसविलेले पर्जन्यमापक याच्यावरील पावसाच्या नोंदी घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची व्यवस्था आहे. तर पाडळोशी येथील पर्जन्यमापकाची नोंद दोन ते तीन दिवसांनी तहसीलदार कार्यालयाकडे कळविली जाते. यामुळे येथेही वेळोवेळी नोंदी मिळत नाहीत. या सर्व ठिकाणच्या नोंदीमध्ये मोठी तफावत असते. काही पर्जन्यमापक यंत्रामधील सदोष पावसाच्या नोंदीमुळे गतवर्षी काही ठिकाणी घरांच्या पडझडी होवूनही शासनाच्या निकषात बसत नसल्याचा कांगावा करीत तलाठी महाशयांनी पंचनाम्याचा ससेमिरा टाळण्यासाठी वरिष्ठांना पावसाच्या चुकीच्या नोंदी कळवून दिशाभूल करण्याचेही प्रकार घडले आहेत. यादृष्टीने तहसीलदार यांनी असे प्रकार टाळण्यासाठी पावसाच्या योग्य व अचूक नोंदी घेण्याबाबत संबंधितांना सूचना कराव्यात. तसेच नादुरूस्त स्थितीतील असलेली पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत आणावीत, अशीही मागणी चाफळसह विभागातील जनतेतून जोर धरीत आहे.