Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यात 257 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
aikya group
Friday, July 30, 2010 AT 02:18 AM (IST)
Tags: Local News,  
सातारा, दि. 29 ः दि. 30 जुलै रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील 557 ग्रामपंचायतींच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या 257 ग्रामपंचायतींच्या प्रचाराची बुधवारी सायंकाळी 5 वाजता सांगता झाली.
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील माण आणि कोरेगाव तालुका वगळता उर्वरित नऊ तालुक्यांमध्ये 324 ग्रामपंचायतींसाठी दि. 8 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून यापैकी शंभरहून अधिक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच स्पष्ट झाले. जावली तालुक्याने बिनविरोधचा डंका कायम ठेवत 22 ग्रामपंचायती बिनविरोध केल्या आहेत. कराड आणि वाई तालुक्यात प्रत्येकी 16 तर खटाव तालुक्यात 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनचा वापर होणार आहे. 257 ग्रामपंचायतींसाठी 837 मशिनचा वापर होणार असून सर्व यंत्रसामग्री ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, तेथे पोहोच केली आहे. 63 संवेदनशील गावे असून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 4 हजार 185 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून या सर्व कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रशिक्षण गुरुवारी झाले.
सातारा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात 17 ग्राम-पंचायतीसाठी मतदान होणार होते. मात्र, यापैकी अटाळी, भोंदावडे, पिलाणी, सोनगाव सं. निंब या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता चौदा ग्राम-पंचायतींसाठी मतदान होणार आहे. 
जावली तालुक्यात 22 बिनविरोध
जावली तालुक्याने बिनविरोधची परंपरा कायम ठेवली आहे. दुसऱ्या टप्प्यातील 38 पैकी 22 ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध तर 11 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. फक्त चार ठिकाणी पूर्णतः निवडणुका होणार आहेत. घोटेघर ग्रामस्थांनी निवडणुकीकडे पाठ फिरवत एकही अर्ज दाखल केला नाही. करंजे, करंदी तर्फ मेढा, महू, गवडी, निपाणी, बामणोली, मामुर्डी, बेलोशी, वेळे, रेंगडी, कारगाव, पिंपरी तर्फ मेढा, वेरोशी, भुतेघर, पुनवडी, हातगेघर, हुमगाव, सर्जापूर, रानगेघर, सरताळे, बोंडारवाडी, महिगाव येथील निवडणुका पूर्णतः बिनविरोध झाल्या. तालुक्यात सर्वात मोठ्यात असणाऱ्या कुडाळ ग्रामपंचायतीसाठी मोठी चुरस आहे. 13 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी 49 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
खटाव तालुक्यात 6 बिनविरोध
खटाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात 40 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 34 ग्रामपंचायतींसाठी आता येथील लढती होणार असून 688 उमेदवार रिंगणात आहेत. भोसरे, लोणी, गारूडी, दातेवाडी, मांडवे आणि अनफळे या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 
वाई तालुक्यात 16 बिनविरोध
वाई तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात 33 पैकी 16 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता 14 ग्रामपंचायतीसाठी रंगत होणार आहे. लोहारे, पसरणी, मेणवली, बोपेगाव, वरखडवाडी, बोरीव, वाशिवली, वयगाव, दरेवाडी, रेणावळे, दसवडी, नांदगणे, कोंढवली, व्याहळी, गुंडेवाडी, शेलारवाडी या ग्रामपंचायतींचा बिनविरोधमध्ये समावेश आहे. काही ग्रामपंचायतीमध्ये अंशतः बिनविरोध निवडी झाल्या आहेत.
फलटण तालुक्यात 4 बिनविरोध
फलटण तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात 37 पैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता 33 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 585 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 598 उमेदवार रिंगणात आहेत. घाडगेवाडी, शिंदेनगर, बोडकेवाडी, आळजापूर या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
खंडाळा तालुक्यात 4 बिनविरोध
खंडाळा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात 22 पैकी 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 18 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. पळशी, वाण्याचीवाडी, म्हावशी, शेखमीरवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 270 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 220 उमेदवार रिंगणात आहेत.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: