माथेफिरूचा थयथयाट
- अजय पाटील
Friday, July 30, 2010 AT 01:37 AM (IST)
राजधानी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अयशस्वी झाल्या तर मला खूप आनंद होईल आणि त्या यशस्वी झाल्या तर, मला वाईट वाटेल, अशी विकृत गरळ ओकणाऱ्या कॉंग्रेसचे खासदार मणिशंकर अय्यर यांचे नक्कीच डोके फिरलेले दिसते. राष्ट्रकुल खेळ संयोजन समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी यांच्या द्वेषाने पछाडलेल्या अय्यर यांनी, राजधानी दिल्लीत केलेल्या या थयथयाटामुळे केंद्र आणि दिल्ली सरकारची, कॉंग्रेस पक्षाचीही बेअब्रू झाली. अय्यर हे बेलगाम आणि भंपक बोलण्याबद्दलच प्रसिध्द असल्यामुळे, हे समर्थाघरचे श्वान भुंकत असले तरी, त्याला बांधून घालायची धमक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यात नाही. कारण ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहेत. या घराण्याची त्यांच्यावर मर्जी असल्यामुळेच, ते पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनाही अशा दुगाण्या झाडतात. देशाचा मान वाढवणाऱ्या या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जगातले 71 देश भाग घेणार आहेत. या स्पर्धा अवघ्या साठ दिवसांवर आल्या असताना, त्यांचा बोजवारा उडावा, संयोजन समितीचा फजितवाडा व्हावा, अशा असुरी महत्वाकांक्षेने पछाडलेल्या अय्यर यांना पक्षाने आता तात्काळ वेड्यांच्या दवाखान्यातच उपचारासाठी दाखल करायला हवे. त्याशिवाय त्याचे बिघडलेले मानसिक संतुलन जाग्यावर येणार नाही. एक काळ माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव गांधी यांच्या मर्जीत असलेल्या, खासदार मणिशंकर अय्यर यांचे डोके, केंद्रीय मंत्रिपद मिळाले नसल्याने फिरले आहे. गांधी घराण्याशी आपण एवढे एकनिष्ठ असतानाही आपल्याला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले नाही, याचा राग त्यांच्या मनात खदखदतो आहे. त्यामुळेच त्यांना अलिकडे वारंवार वेडाचे झटके येत असावेत, असे दिसते. "आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला', अशी त्यांची वृत्ती केंद्रात मंत्रिपद मिळाले तेव्हापासून झाली होतीच. राजीव गांधींचे आपण निकटवर्तीय आहोत, याची घमेंडही त्यांना चढली होती. सत्तेच्या मस्तीत ते पक्षातल्या आणि विरोधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांवरही सतत तोंडसुख घेत असत. सक्रिय राजकारणात यायच्या आधी ते भारतीय परराष्ट्रीय सेवेत होते. राजीव गांधींनी त्यांना राजकारणात आणले. लोकसभेवर निवडून येताच त्यांना मंत्रिपद दिले. राजीव गांधींच्या कृपेने सत्तेचे पद मिळताच, "आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या, त्याचे येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना।', या संत वचनाची प्रचिती त्यांच्या पक्षातल्या आणि संसदेतल्या नेत्यांना यापूर्वीही आली आहेच. अंदमानच्या काळ कोठडीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अनंत यातना सहन केल्या. त्यांच्याबरोबरच शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनीही स्वातंत्र्यासाठीच छळ सोसला. त्यांच्या स्मरणार्थ अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरमधल्या त्या कुख्यात सेल्युलर जेल समोर बसवली जाणारी स्मृती शलाकाही या हरामखोर माणसाने बसवू दिली नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कारकिर्दीत स्वा. सावरकर यांच्या नावाने ही स्मृती शलाका तेथे बसवायचा निर्णय झाला होता. पण, त्यांचे सरकार गेले आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर येताच, मणिशंकर अय्यर यांचे स्वातंत्र्यवीरांचे नाव त्या स्मृती शलाकेवर असल्याचे समजताच पित्त खवळले. या भंपक नेत्याने, ती स्मृती शलाका फेकून दिली आणि सेल्युलर जेलसमोर महात्मा गांधीजींच्या नावाची स्मृती शलाका समारंभपूर्वक बसवली. स्वातंत्र्यवीरांच्या अपूर्व त्यागाची अशी विटंबना करणारा हा दीर्घद्वेषी भंपक पुढारी आहेत. काविळ झालेल्या माणसाला सारे जग पिवळे दिसते, तसे त्यांनाही चांगले काही, दिसेनासे झाले आहे. त्यांच्या रक्तातच असा द्वेष भिनला असल्यामुळे, ते चांगल्याचेही वाटोळे व्हावे, यासाठीच थयथयाट करीत राहणार!
देशाची बदनामी
राजधानी दिल्लीत आणि केंद्रातही कॉंग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर असताना, अय्यर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठीच्या स्टेडियमच्या बांधकामात, डागडुजीत आणि तयारीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा सवंग आरोप केला. या कामांच्या मंजूर केलेल्या निविदात अनियमितता तर आहेच, पण कामेही हलक्या दर्जाची झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एवढ्यावरच ते थांबलेले नाहीत. या स्पर्धांचे संयोजन भारताला मिळावे, यासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजन समितीच्या राष्ट्रांना प्रत्येकी एक लाख डॉलर्स लाच दिल्याचाही खळबळजनक आरोप त्यांनी केल्यामुळे कॉंग्रेस पक्ष आणि सरकारचीही कोंडी झाली. या साऱ्या स्पर्धांचेच वाटोळे झाले पाहिजे, त्या उधळल्या गेल्या पाहिजेत,असे शिव्याशाप देत त्यांनी या स्पर्धा घेणारे सैतानी, राक्षसी वृत्तीचे लोक असल्याची शिवीगाळही जाहीरपणे केली. जवाहरलाल नेहरु स्टेडियमध्येच अय्यर यांनी हा सारा थयथयाट केला आणि कॉंग्रेसवाल्यांनी तो शांतपणे पाहिला, ही शरमेची बाब होय. या असल्या नादान आणि तोंडाळ नेत्यामुळे केवळ पक्षाचीच नव्हे, तर देशाचीही आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात प्रचंड बदनामी झाली आहे. या असल्या माथेफिरूला पक्षश्रेष्ठींनी बाहेरचा रस्ता दाखवायला हवा अन्यथा हा अस्तनीतला निखारा पक्षाला चांगलाच महागात पडेल, हे अय्यर यांच्या वाचाळपणाने सिध्दही झाले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या संदर्भात अय्यर यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, त्याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा कॉंग्रेसचे ्रप्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला असला तरी, अय्यर यांच्या बोलभांडपणामुळे पक्षाचे नुकसान व्हायचे ते झाले आहेच! राष्ट्रकुल स्पर्धेसाठी नव्याने बांधलेल्या स्टेडियमच्या बांधकामात गैरप्रकार झालेही असतील. त्याची चौकशी सरकार करेल. पण स्टेडियमच्या बांधकामाशी ज्यांचा काही संबंध नाही, त्या सुरेश कलमाडी यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप करणे हे, वडाची साल पिंपळाला लावायचा प्रकार होय. खुद्द कलमाडी यांनीही जाहीरपणे अय्यर यांच्या बिनबुडाच्या आरोपांचा समाचार घेतला. अय्यर हे देशद्रोही आहेत, अशा शब्दात कलमाडी यांनी त्यांच्यावर चढवलेला हल्ला अयोग्य असला तरी, त्यांचा संताप समजून घ्यायला हवा. कलमाडी यांच्यावर ही वेळ आणली ती, अय्यर यांनीच. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा उंबरठ्यावर आल्या असताना काही स्टेडियमची बांधकामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. तयारीतही काही उणिवा राहिल्या आहेत. त्या दूर करून या स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे व्हाव्यात, यासाठी सरकार आणि संयोजन समितीला पक्ष भेद विसरून मदत करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. खेळ सुरु झाल्यावर, संयोजनातल्या उणीवा चव्हाट्यावर आल्यास त्यात देशाचीच बेअब्रू होईल, याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे! अय्यर यांना ते नसल्यामुळेच हा सारा तमाशा सुरु झाला आहे.