"राडे'बाज कॉंग्रेस नेते निलंबित
PTI ---
Thursday, July 29, 2010 AT 03:00 AM (IST)
मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी) : पुण्यातील कॉंग्रेस जिल्हा कार्यालयात झालेल्या हाणामारीची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज संजय जगताप व पुरंदरचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांना पक्षातून निलंबित केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर व रमेश शेट्टी यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी पुण्यातील कॉंग्रेस भवन येथे बैठक झाली होती. या बैठकीत माजी आमदार संभाजी कुंजीर यांना संजय जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीतच लाथा-बुक्क्या व खुर्च्यांनी बेदम मारहाण केली होती. या राड्याची दृश्ये सर्व दूरचित्रवाहिन्यांवर झळकल्याने कॉंग्रेस पक्षाची अवस्था वाईट झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज तातडीने संभाजी कुंजीर व संजय जगताप या दोघांनाही पक्षातून निलंबित केले. माजी खासदार रामशेठ ठाकूर व रमेश शेट्टी या दोघांची समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.