पावसाचा जोर ओसरला
aikya group
Wednesday, July 28, 2010 AT 02:19 AM (IST)
सातारा, पाटण, फलटण (प्रतिनिधी) दि. 27 ः सातारा शहर आणि परिसरासह जिल्ह्यात बेंदराच्या मुळावर लागलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून चांगलेच झोडपून काढले होते. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, मंगळवारी जिल्ह्याचा काही भाग वगळता पावसाचा जोर ओसरला होता; परंतु अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळतच होत्या. दरम्यान, गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळेसातारा-लिंबखिंड रस्त्यावरील मोळाच्या ओढ्याच्या पुढे नितीराज ढाब्यासमोरील महाकाय वटवृक्ष मंगळवारी रात्री कोसळला.
जुन्या सातारा-पुणे महामार्गा वरील ब्रिटिशकालीन हा महाकाय वटवृक्ष कोसळल्याने सकाळी या मार्गावरील सर्वच वाहतूक ठप्प झाली होती. ज्या वाहनचालकांना याची कल्पना नव्हती ते वाहनचालक तिथपर्यंत जाऊन माघारी फिरत होते तर दुचाकीस्वार ओढ्यातून मार्ग काढून प्रवास करत होते. हा वटवृक्ष कोसळल्याने वर्ये, नेले, किडगाव, धावडशी, रामनगर, कळंबे येथील विद्यार्थी, चाकरमाने यांना चांगलीच कसरत करावी लागली तर शाळा, महाविद्यालयाला विद्यार्थ्यांना दांडी मारावी लागली. सकाळी 10 नंतर पडलेल्या वडाच्या झाडास कटरच्या सहाय्याने कापून बाजूला करण्याच्या कामाला सुरूवात झाली होती. दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात महाबळेश्र्वर तालुक्यात 215 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 54.44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात काल दिवसभर आणि आज सकाळी 8 वाजेपर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे : सातारा - 67 मि.मी., जावली -120.3 मि.मी., कोरेगाव - 37.2 मि.मी., कराड - 17 मि. मी., फलटण - 6 मि. मी., माण - 6.2 मि.मी., खटाव - 6 मि.मी., वाई - 44 मि.मी., महाबळेश्र्वर - 215 मि.मी. आणि खंडाळा तालुक्यात 10.2 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कण्हेर धरणामध्ये 5.51 टीएमसी आणि धोम धरणामध्ये 5.92 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
पाटणमध्ये संततधार सुरूच
पाटण ः पाटण तालुक्यात गेल्या 24 तासात पावसाची संततधार कायम असून वाऱ्याचा वेग वाढला आहे. मात्र तालुक्यातील नद्यांची पाणीपातळी कमी झाली आहे. वेगाच्या वाऱ्यामुळे पाटण तालुक्याच्या मणदुरे विभागातील सुमारे 47 गावांचा गेल्या तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारी कार्यरत झाले असून रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. बिबी व म्हारवंड दरम्यान विजेची तार तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने पाटणवासियांना सूर्यदर्शन झाले.
दरम्यान, पाटण, मोरगिरी, कोयना, मल्हारपेठ, ढेबेवाडी, तारळे, चाफळ, मणदुरे या खोऱ्यात अद्यापही पावसाचा जोर कायम असून शेतकरी भर पावसातही भात लागणीत व्यस्त आहेत. पाटण तालुक्यातील सर्व भागांना जोडणाऱ्या रस्त्यांची पावसामुळे दुर्दशा झाली आहे. मोरणा, केरा या नद्यांचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने कोयना नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे.
कोयना विभागात मात्र पावसाचा जोर कायम असून ओझर्डे धबधबा ओसंडून वाहत आहे. कोयना धरणांतर्गत वसलेल्या डिचोली, झाडोली, पुनवली, ढोकावळे, आंबेघर या गावांचे अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यावर चालणाऱ्या लॉंचसेवेत अनिश्चितता निर्माण झाल्याने तेथील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात गतीने वाढ होत असल्याने धरणाच्या आतील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. मोरणा विभागातील वाडीकोतावडे फरशी पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस धोकादायक स्थिती बनली आहे. चाफोली-पाटण रस्त्यावरील दिवशी खुर्द गावाजवळील ओढ्याला पूर आल्याने फरशीवरून पाणी वाहत होते. त्यामुळे दिवशी, जुंगटी या तीन गावातील विद्यार्थ्यांना ओढ्याला आलेल्या पुरामुळे विद्यालयास जाण्यास अडचण निर्माण झाली. मोरणा विभागातील उंबरणे, आटोली या दुर्गम गावातील जनतेचा ओढ्यांना आलेल्या पुरामुळे मंगळवारीही संपर्क तुटला.
कोयना धरणात मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61.89 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सोमवार ते मंगळवारी 5 पर्यंत झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे : कोयना 151 मि.मी. (1751), नवजा 121 (2229), महाबळेश्वर 170 (2175), पाटण 70 (731), तारळे 33 (465), मल्हारपेठ 25 (474), चाफळ 25 (225), ढेबेवाडी 42 (516), तळमावले 35 (506), मरळी 37 (577).
गुंजवणी धरणाच्या सांडव्यावरुन 1800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
नीरा : भाटघर, नीरा-देवघर या धरणांच्या पाणीपातळीत संततधार पावसामुळे वाढ झाली आहे. नीरा-देवघर आणि भाटघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु आहे. गुंजवणी धरण गेले दोन दिवसांपासून पूर्णपणे भरले असून गुंजवणी धरणाच्या सांडव्यावरुन 1800 क्युसेक्स पाणी वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत असल्याची माहिती नीरा उपविभागाचे उपअभियंता हिंदुराव खोत यांनी दिली.
नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज 137 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून आजअखेर या क्षेत्रात 828 मि.मी. इतका एकूण पाऊस झाला आहे. आज नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 3 हजार 724 दशलक्ष घनफूट इतका 30.32 टक्के पाणीसाठा झाला आहे.
भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 11 हजार 844 दशलक्ष घनफूट इतका 49.86 टक्के पाणीसाठा झाला आहे. भाटघर धरणाच्या परिसरात मंगळवारी 100 मि.मी. इतका पाऊस झाला असून आजअखेर एकूण 775 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
गुंजवणी धरणाच्या परिसरात आज 133 मि.मी. इतका मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून या धरणाच्या परिसरात आजअखेर 918 मि. मी. इतक्या मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. गेले दोन दिवसांपूर्वी गुंजवणी धरण पूर्णपणे भरले असून या धरणातील सद्याची पाणीसाठ्याची पातळी 708.20 फूट आहे. गुंजवणी धरणाच्या सांडव्यावरुन सध्या 1800 क्युसेक्स इतक्या प्रमाणावर पाणी वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत आहे.
पुरंदर तालुक्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज 6 हजार 804 घनफूट, 67.78 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. वीर धरणाच्या परिसरात आज 20 मि. मी. इतक्या अल्प प्रमाणात पावसाची नोंद झाली असून आजअखेर 429 मि. मी. इतका पाऊस झाला असल्याचे नीरा उपविभागातील अधिकारी अशोक पोतदार यांनी दिली.
शेटफळ तलावासाठी नीरा डाव्या कालव्यातून पाणी
इंदापूर तालुक्याला वरदान ठरलेले ब्रिटिशकालीन 620 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या शेटफळ तलावासाठी वीर धरणामधून नीरा डाव्या कालव्यातून सोमवारपासून 700 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. या संदर्भात जलसंपदामंत्री अजित पवार यांनी विशेष सूचना दिल्या असल्याची विश्वसनीय माहिती आहे. वीर धरणातून नीरा डाव्या कालव्यातून 700 क्युसेक्स तर नीरा उजव्या कालव्यातून 800 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असल्याने पुरंदर, फलटण, माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.