Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भांबुरे यांनी नीरा उजवा कालव्यावर उभारला ऊर्जानिर्मिती प्रकल्प
aikya group
Wednesday, July 28, 2010 AT 02:32 AM (IST)
Tags: region
फलटण, दि. 27 : कालव्याच्या वाहत्या पाण्यावर ऊर्जानिर्मिती करणारा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प येथील संशोधक अ. रा. भांबुरे यांनी नीरा उजवा कालव्याच्या फाटा क्र. 24 (विडणी) येथे यशस्वीरित्या कार्यान्वित करुन वीजनिर्मिती सुरु केली आहे.
जलविद्युत निर्मितीसाठी आतापर्यंत उंचावरुन पाणी खाली आणावे लागत असे, तथापि भांबुरे यांनी यशस्वीरित्या कार्यान्वित केलेल्या या प्रकल्पात कालव्यातून संथ वाहणाऱ्या पाण्याद्वारे वीज निर्मिती यंत्राला गती देवून वीज निर्मिती होत आहे. त्यासाठी कालव्याच्या बांधकामात कोणताही बदल करावा लागत नाही किंवा कालव्याच्या वाहत्या पाण्याला कसलाही अडथळा होत नाही. शेतीला जाणाऱ्या पाण्यात कोणतीही कपात होत नाही. पाणी वाया जात नाही, असे सांगून पवनचक्क्यांद्वारे वीजनिर्मितीपेक्षा या प्रकल्पाद्वारे होणारी वीजनिर्मिती कमी खर्चाची असल्याचे भांबुरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या वीज टंचाई आणि भारनियमनाच्या प्रश्नातून मुक्त होण्यासाठी या प्रकल्पाचा चांगला उपयोग करुन घेता येईल. त्यादृष्टीने राज्याचे जलसंपदा व ऊर्जा मंत्री ना. अजित पवार, जलसंपदा मंत्री ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे लक्ष वेधण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचे भांबुरे यांनी सांगितले.
थ्री फेज मोटार प्रोटेक्टर, शॉक इंडिकेटर ऍण्ड सर्किट ब्रेकर, मेडिकल सर्जीकल सेक्शन पंप, मॉडीफिकेशन इन आटाक्लेव, वनटाइम डीबेटींग आटो-मेटीक लाईट प्रोव्हायडेड ऍण्ड पोल्युशन फ्री मशीन आदी उपयुक्त साधनांचे शोध व निर्मिती आजपर्यंत भांबुरे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
कालव्याच्या पाण्यावर वीज निर्मिती प्रकल्पाचे संशोधक भांबुरे हे पेटंट होल्डर असून संथ पाण्यावर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी त्यांना डॉ. धुमाळ, थिटे, प्रधान आणि विडणी येथील देशपांडे कुटुंबियांचे सहकार्य लाभले.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: