Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

"मारुती'पर्वाची अखेर
aikya group
Wednesday, July 28, 2010 AT 01:05 AM (IST)
Tags: editorial,  

हिंदकेसरी पहिलवान मारुती माने यांच्या निधनाने तरुण मल्लांचा आणि महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्राचा भक्कम आधारवड कोसळला आहे. मारुती माने सांगली शहराजवळच्या कवठे पिरानचे! गावातल्याच तांबड्या मातीत कुस्ती खेळता खेळता त्यांनी दररोज बारा तास व्यायाम आणि कुस्तीची मेहनत घेतली. पारंपरिक मातीच्या कुस्तीबरोबरच आधुनिक गादीवरच्या कुस्तीचाही त्यांनी जाणीवपूर्वक सराव केला. भारतीय कुस्तीचा झेंडा सातासमुद्रापार फडकवायच्या जिद्दीनेच ते लाल मातीच्या आखाड्यात उतरले होते. मारुती या नावाप्रमाणेच त्यांचे शरीर बलदंड तर होतेच पण, शक्तीही तशीच अचाट होती. कुस्तीतले डावपेच आणि त्यांच्या ताकदीसमोर त्या काळातल्या दिग्गज मल्लांचाही टिकाव लागला नाही. 1962 मध्ये जाकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्यांनी आपल्या कुस्ती कौशल्याचा डंका विदेशातही वाजवला. या यशानंतर त्यांनी पुढे दहा वर्षे कधीच मागे वळून पाहिले नाही. मारुती माने माती किंवा गादीवरच्या कुस्तीत हरले नाहीत. 1965 मध्ये कटक येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत तेव्हाचा अजिंक्य मल्ला भोला सियाराम याला अस्मान दाखवून सुवर्णपदक जिंकले. पुढच्याच वर्षी रशियातल्या जागतिक स्तरावरच्या कुस्ती स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदक मिळवले. इंग्लंडमध्ये मॅंचेस्टर येथे 1967 मध्ये झालेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेत रशियाचा मल्ल अलेक्झांडर मीदवीद याच्याशी अकरा मिनिटे अटीतटीची झुंज देऊन त्याला हरवत रौप्यपदक मिळवले. मीदवीद हा त्या काळातील प्रचंड दबदबा असलेला मल्ल होता. जागतिक स्तरावर कुस्तीमध्ये सलग चार वेळा जगज्जेतेपद मिळवलेल्या या मल्लासमोर जगातला कोणताही मल्ल दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळा टिकला नव्हता.  त्याच्याशी मारुती माने यांनी अत्यंत निर्धाराने, चिवटपणे लढत तर दिलीच पण त्यालाही हरवले, तेव्हा जागतिक कुस्ती क्षेत्रात त्यांच्या नावाचा प्रचंड दबदबा निर्माण झाला. एडिनबर्ग (स्कॉटलंड) मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदक जिंकले होते. जागतिक क्षेत्रात भारतीय कुस्तीचे वर्चस्व निर्माण करणारे मारुती माने हे, हेलसिंकीच्या ऑलिंपिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्यानंतरचे पहिलेच मल्ल. त्यांनी जाधव यांची विजयी परंपरा आपल्या कर्तृत्वाने पुढे चालविली. प्रचंड आत्मविश्वास, जिद्द आणि शक्तीच्या बळावर भारतातल्या ख्यातनाम मल्लांनाही त्यांनी पराभवाचे पाणी पाजले होते. 1964 मध्ये हिंदकेसरी मास्टर चंदगीराम यांना दोन वेळा सहजपणे पराभूत करणाऱ्या सव्वासहा फूट उंचीच्या मेहरुद्दीनला पंजाबमधल्या कर्नाल येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी पराभूत करीत हिंदकेसरी पदाचा किताब जिंकला. त्याच वर्षी सेना दलाचा होनहार मल्ल भीमसेन यांना दिल्लीच्या मैदानात आणि मोहम्मद हनिफ यांना कोल्हापूरच्या मैदानात चारी मुंड्या चित करुन, कृष्णेचे पाणी पाजले. समोरचा मल्ल किती मोठा आणि किती ताकदीचा, त्याने कुणाकुणाला हरवले याचा विचार मारुती माने यांनी कधीच केला नाही. आपण कुस्ती जिंकायसाठीच आखाड्यात उतरतो आणि आत्मविश्वासाने लढत देऊन कुस्ती जिंकतो, असे आपल्या यशाचे रहस्य ते सांगत असत. कुस्ती आणि कोणत्याही खेळात जय-पराजय हा असतोच. पण, पराभवाच्या भितीने दिल टाकून खेळ केल्यास विजय कधीच मिळत नाही. अत्यंत आत्मविश्वासाने खेळ केल्यास विजयश्री हमखास मिळतेच, असा त्यांचा तरुण मल्लांना सल्ला होता.
सर्वांचे लाडके भाऊ
कुस्ती हा मारुती माने यांचा प्राण होता. कुणाशीही कुस्ती करायला त्यांनी कधीच नकार दिला नाही. आपल्यापेक्षा नाव असलेल्या मल्लाशीही त्यांनी कुस्त्या केल्या आणि त्या जिंकल्याही. पाकिस्तानचा दिग्गज पहिलवान सादिक पंजाबी हा त्याच्या खेळाने कुस्ती रसिकांचा लाडका होता. त्यालाही त्यांनी कोल्हापूरच्या शाहू खासबाग मैदानात सहजपणे अस्मान दाखवले. याच मैदानात दत्ता सिंगलाही पराभूत केले. कुस्ती पंढरी कोल्हापूरच्या राजर्षी छ. शाहू खासबाग मैदानातच मारुती माने आणि विष्णू सावर्डेकर यांची 1965 मध्ये झालेली कुस्ती अविस्मरणीय ठरली. या कुस्तीची तिकिटे हजारो कुस्ती रसिकांना मिळाली नाहीत. ही कुस्ती झाली त्या दिवशी खासबागच्या कुस्ती आखाड्यात पंचवीस हजार प्रेक्षक होते आणि मैदानाबाहेरही तितक्याच प्रेक्षकांची अलोट गर्दी होती. प्रचंड पोलीस बंदोबस्तात या दोन सिंहांची लढत सुरू झाली. दोघेही बलदंड आणि समान शक्तीचे, डावपेचात तरबेज. त्या कुस्तीत कोण विजयी होणार? याचा अंदाज कोणालाही बांधता येत नव्हता. तब्बल अडीच तासांच्या आक्रमक आणि चिवट झुंजीनंतर मारुती माने यांनी विष्णू सावर्डेकर यांना चितपट केले आणि एक अविस्मरणीय कुस्ती पाहिल्याचा आनंद कुस्ती रसिकांना मिळाला. प्रदीर्घ काळ चाललेली कुस्ती अशी कुस्तीच्या इतिहासात या लढतीची नोंद झाली. 1966 मध्ये मास्टर चंदगीराम या अत्यंत गुणी आणि चपळ मल्लाला त्यांनी बेळगावच्या मैदानात पराभवाची धूळ चारली होती. ती कुस्तीही प्रचंड गाजली होती. यशाच्या अत्युच्च शिखरावर असतानाच, मारुती माने यांनी कुस्ती क्षेत्राचा विनम्रपणे निरोप घेतला. पुढचे सारे आयुष्य त्यांनी कुस्ती क्षेत्राचा विकास आणि तरुण मल्लांच्या समस्या सोडवायसाठी घालवले. अखिल भारतीय कुस्ती निवड समितीचे सदस्य, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष, अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेचे सदस्य, अखिल भारतीय माजी मल्ल संघटनेचे उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या होत्या. मारुती माने हे नावाप्रमाणेच वायू वेगाने कुस्त्या करण्यात कुशल आणि तरबेज होते. महाराष्ट्रातल्या लाल मातीचा त्यांना विलक्षण अभिमान होता. दिल्लीच्या सतपालने कोल्हापूरच्या मैदानात पहिलवान दादू चौगुलेला हरवून महान भारत केसरीपदाचा सन्मान जिंकला आणि नव्या पद्धतीच्या कुस्तीचा डंका त्याचे गुरू हनुमान यांनी पिटला. सतपाल समोर कुणीही मल्ल टिकत नसे. त्याचे कुस्तीकौशल्य अफाट आहे, असा दबदबाही निर्माण झाला होता. तेव्हा, मारुती माने यांनी पहिलवान युवराज पाटील आणि हरिश्चंद्र बिराजदार या दोन्ही मल्लांना, मराठी मातीची आण घालत, प्रेरणा दिली. आपल्या देखरेखीखाली सरावही करायला लावला. तुम्ही कधीच हरणार नाही, असा आत्मविश्वासही निर्माण केला. या दोन्ही मल्लांनी सतपालच्या कुस्तीतल्या नव्या तंत्राचा फुगा फोडत त्याला बेजोड करुन पराभूत केले. आपल्या कुस्तीच्या जीवनातला हा सुवर्णाचा क्षण अशा शब्दात मारुती माने यांनी, या मल्लांनी मिळवलेल्या विजयाचा आनंद लुटला होता. तरुण मल्लांना सतत प्रेरणा देणारे, मायेने त्यांच्यासाठी सरकार दरबारी भांडणारे, त्यांच्या समस्या सोडवणारे, त्यांचे हक्काचे वडीलधारे माणूस आता कायमचे काळाच्या पडद्याआड गेले आहे. मारुती माने हे "भाऊ' या नावाने परिचित होते. त्यांचा लोकसंग्रह अफाट होता. राजकारणाच्या धकाधकीतही त्यांनी पक्षीय राजकारण आपल्या मैत्रीआड कधीच आणले नाही. त्यांच्या मित्र परिवारात आणि जनतेतही ते शेवटपर्यंत "भाऊ'च राहिले. महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांचा आणि जनतेचा हा लाडका भाऊ आता आपल्यात नसला तरी, कुस्ती क्षेत्राला त्यांचे कार्य सतत प्रेरणा देत राहील.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: