Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
परदेशी पाहुण्यांनी अंध विद्यार्थ्यांशी साधला संवाद
aikya group
Tuesday, July 27, 2010 AT 12:36 AM (IST)
Tags: regional,  
सातारारोड, दि. 26 : येथील चंद्रकांत वसंतरावदादा पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया-मध्ये इतर विद्यार्थ्यांंसमवेत आठ अंध विद्यार्थी शिक्षण घेत
आहेत. शिक्षणामुळे भारतीयांची प्रगती या विषयावर शोधनिबंध लिहिण्यासाठी युरोप व अमेरिकेमधून 2 शिक्षिका व 1 शिक्षक यांनी या विद्यालयास नुकतीच भेट देवून अंध विद्यार्थ्यांशी दुभाषाच्या सहकार्याने संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, युरोपमधील जोसेफ व अनिता (तिच्या शेजारी भारतीय राहत असल्याने तिने आवडीने धारण केलेले नाव.) आणि अमेरिकेतील व्हर्जिनिया हे तीन शिक्षक सत्यशोध संस्था, सातारा यांच्या सहकार्याने सातारारोड, ता. कोरेगाव येथील चंद्रकांत पाटील विद्यालयात आले होते. परदेशी लोकांचे पेहराव, इंग्रजी संभाषण ऐकण्यासाठी व त्यांना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. परदेशी पाहुण्यांचे संस्थेचे चेअरमन ऍड. वसंतराव फाळके यांनी स्वागत केले. रांगोळी काढून व औक्षण करुन भारतीय पध्दतीच्या स्वागतामुळे परदेशी पाहुणे भारावून गेले. त्यांची आठवण म्हणून त्यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. भारत सरकार मानते की शिक्षणामुळे प्रगती होते. त्यामुळे आम्ही येथे आलो असल्याचे सांगून युरोप, अमेरिकेपेक्षा भारतात चांगले शिक्षण मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्यशोधचे श्रीकांत के. टी. यांनी दुभाषाचे काम केले.
तुम्ही का शिकता या प्रश्नावर अंध विद्यार्थी म्हणाले, आम्हाला दाखवून द्यायचे आहे की अंध असलो तरी शिक्षणामुळे आम्ही स्वत:च्या पायावर उभे राहू शकतो. डोळस मुलांमध्ये शिकताना आम्हाला काही अडचणी येत नाहीत, ते आम्हाला सावरतात. आम्हाला गायन, वादन, खेळ आवडतात. ब्रेल लिपीच्या सहाय्याने अभ्यास करत रायटरच्या सहाय्याने आम्ही परीक्षा देतो. शिकून आम्हाला इतर अंध मुलांना शिकवायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन ऍड. वसंतराव फाळके, प्राचार्य एच. आर. नेवासे, विश्वस्त संग्रामसिंह फाळके, उपप्राचार्य गायकवाड, पर्यवेक्षक जाधव,  कुरवडे, एम. डी. जाधव, सी. डी. पंडित, श्रीनिवास पवार, भागवत, उपशिक्षिका वाघमारे आदी उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: