पावसाचा जोर कायम राहणार
ऐक्य समूह
Monday, July 26, 2010 AT 01:14 AM (IST)
पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांपासून पुण्या मुंबईसह राज्यात संततधार सुरू असणाऱ्या पावसाचा जोर पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांमध्ये कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.
ओरिसा किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. पुण्यातही दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांची रविवारची सुट्टी पाण्यात गेली.
धरण परिसरातही पाऊस वाढला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता. दिवसभरात खडकवासला - 27, पानशेत - 69, वरसगाव - 73, टेमघर - 90, पवना- 132 आणि मुळशी धरणात 58 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याच्या टक्केवारीत 15.72 टक्क्यांनी वाढ झाली असून चारही धरणांमध्ये 4.57 टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.