चंद्राबाबूंचा तमाशा
aikya group
Thursday, July 22, 2010 AT 01:46 AM (IST)
आंध्रप्रदेशातल्या जनतेत सवंग लोकप्रियता मिळवायसाठीच महाराष्ट्रातल्या बाभळी धरणावर धडक द्यायसाठी आलेल्या, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंचा पाच दिवस चाललेला धिंगाणा आणि राजकीय तमाशा अखेर संपला! जमावबंदी मोडून अशांतता निर्माण केल्याबद्दलचे त्यांच्यावर दाखल केलेले सर्व आरोप राज्य सरकारने न्यायालयात मागे घेऊन त्यांचा तमाशाचा फड मोडून टाकायची पूर्वतयारी केली. न्यायालयाने परवानगी देताच, नायडू आणि त्यांच्या सोंगाड्या आमदारांची मोळी बांधून त्यांना विशेष विमानाने औरंगाबादहून हैद्राबादला पाठवले गेले. बाभळी धरणाचा वाद उकरुन काढून प्रचंड दंगा करायचा, वातावरण तापवत ठेवायचे आणि सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाची-सरकारची कोंडी करायची असे त्यांनी रचलेले डावपेच, महाराष्ट्र सरकारने असे उधळून लावल्यामुळे "तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे आले', अशी त्यांची अवस्था झाली आहे. आंध्रातल्या तेलंगणा भागात होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकात आपल्या पक्षाला यश मिळावे, या एवढ्याच हेतूच्या साध्यासाठी चंद्राबाबूंना अचानक नांदेड जिल्ह्यातल्या बाभळी धरणाची आठवण आली. पक्षाच्या 74 आमदारांसह आरडाओरडा आणि गोंधळ घालीत, ते जमावबंदी मोडून महाराष्ट्राच्या सीमेत घुसले. नांदेड जिल्ह्यातल्या बाभळीजवळ बांधल्या गेलेल्या या धरणाच्या पाण्याच्या साठ्यामुळे, तेलंगणातल्या गोदावरी नदीकाठच्या गावांना पाणी मिळणार नाही, या भागातील शेती पाण्याशिवाय वाळून जाईल, असे धादांत खोटारडे आरोप करीत चंद्राबाबू महाराष्ट्राच्या हद्दीत घुसले होते. त्यांच्या आरडाओरड्याला आंध्रातल्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांनी प्रसिध्दी दिल्यामुळे, त्यांना आणखी अवसान आले. औरंगाबादच्या तुरुंगातल्या न्यायालयीन कोठडीत त्यांना आणि त्यांच्या समर्थक आमदारांना न्यायालयाच्या आदेशानेच ठेवले होते. पण तेथेेही त्यांनी धिंगाणा घातला. महाराष्ट्र सरकारने, पोलिसांनी आपला अमानुष छळ केल्याचे खोटारडे आणि चिथावणीखोर आरोप ते करीत राहिले. वास्तविक तुरुंगात त्यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या आमदारांची शाही बडदास्त ठेवली होती. या राजकीय कैद्यांना पोलिसांनी, तुरुंगातल्या कर्मचाऱ्यांनी कसलाही त्रास दिला नाही. पण, आंध्राच्या हितासाठी आपण तुरुंंगवास सोसल्याचा गाजावाजा चंद्राबाबूंना करायचा होता. त्यासाठीच त्यांनी जामीन नाकारला. कायद्यानुसार त्यांना न्यायालयीन कोठडी दिली गेली. त्यांना महाराष्ट्रात अटक झाल्यामुळे, तेलगु देसमच्या आंध्रातल्या नेत्यांना, आंध्र सरकारविरुध्द असंतोष निर्माण करायला पेटते कोलीत मिळाले. चंद्राबाबूंच्या अटकेच्या निषेधार्थ आंध्रात एक दिवसाचा बंद पाळायच्या तेलगु देसमने दिलेल्या आदेशाला आंध्रात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच चंद्राबाबूंना आणखी बळ मिळाले. त्यांच्या पक्षाच्या समर्थकांनी महाराष्ट्राच्या सीमेत घुसून दंगल घडवायचाही प्रयत्न केला. या दंगलखोरांना रोखायसाठी गेलेल्या महाराष्ट्राच्या पोलिसांवरही या जमावाने प्रचंड दगडफेक केली. पोलिसांनी त्यांना हाकलून लावले, तेव्हा त्या घटनेचेही राजकीय भांडवल तेलगु देसमने केेले. चंद्राबाबूंच्या या महाराष्ट्राला बदनाम करीत राजकीय लाभ उपटायच्या भंपक उद्योगाच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यात असंतोषाची लाट उसळली आणि धर्माबाद बंद करुन, जनतेने आपला संघटित विरोध दाखवला. शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी औरंगाबाद आणि नांदेडमध्ये चंद्राबाबूंच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करुन, त्यांना आंध्रात हाकलून लावायची मागणी केली होती. ते मात्र परत जायला तयार नव्हते. महाराष्ट्र सरकार जितके अधिक दिवस तुरुंगात ठेवील, तितका अधिक राजकीय लाभ लाटायचा त्यांचा डाव, राज्य सरकारने आंध्रचे मुख्यमंत्री के. रोसय्या यांच्याशी फोनवर चर्चा करुन, पध्दतशीरपणे उधळल्यामुळे त्यांचा राजकीय तमाशा फक्त गाजला.
संधिसाधू राजकारण
मुळात चंद्राबाबूंनी बाभळी धरणाबाबत महाराष्ट्र सरकारवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. गोदावरी पाणीतंटा लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले पाणी अडवायसाठी सरकारने नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यातल्या बाभळीजवळ 2.74 टीएमसी क्षमतेचा बंधारा बांधायला सुरुवात केली. या बंधाऱ्याचे बांधकाम बंद पाडायसाठी आंध्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊनही काही उपयोग झाला नाही. न्यायालयाने हे बांधकाम पुढे सुरु ठेवावे आणि या बंधाऱ्याचे 13 दरवाजे लावू नयेत, असा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयातल्या या दाव्याची सुनावणी अद्याप सुरुच आहे. त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. ही वस्तुस्थिती नायडूंना पूर्णपणे माहिती असतानाही, ते तेलंगणाच्या जनतेची दिशाभूल करायसाठीच, या धरणामुळे आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा थयथयाट करीत आहेत. मुख्यमंत्रिपदावर असताना ते एकदाही बाभळी धरण पहायसाठी गेले नव्हते. या प्रकरणात आपल्याला बाजूच नाही, हे त्यांना तेव्हा माहिती होते. आता मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी हा नवा राजकीय तमाशाचा फड वाजतगाजत महाराष्ट्रात आणला. न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुक्त केल्यावरही, त्यांची नाटकबाजी सुरुच राहिली. धर्माबाद येथून तीन वातानुकुलित मोटारीतून धर्माबादहून औरंगाबादकडे नेताना चंद्राबाबूंनी दोन वेळा उतरुन रस्त्यातच ठाण मांडले. आपण काही झाले तरी बाभळीला जाणारच, असा हट्ट त्यांनी धरला. विमानतळावर गेल्यावरही, धावपट्टीवर बसकन मारुन धिंगाणा घातला. महाराष्ट्र सरकारने आमची फसवणूक केली, आम्ही हैद्राबादला जाणार नाही, असे चंद्राबाबू सांगायला लागले. महसुली अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कशीबशी समजूत काढून चंद्राबाबू आणि त्यांच्या आमदारांची गाठोडी विशेष विमानात ढकलली आणि हैद्राबादला पाठवून दिली. आंध्रात तुम्हाला जो काही गोंधळ घालायचा तो घाला, महाराष्ट्रात तुमचा तमाशा नको, तुमच्याच भाषेत आम्हीही प्रत्युत्तर देऊ, निदर्शने करु, असा चोख इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेतच चंद्राबाबूंना दिलेला होता. या प्रकरणी सरकारच्या पाठीशी सर्व विरोधी पक्षही एकजुटीने उभे होते. त्यामुळे आंध्र सरकारचीही कोंडी झाली. सर्वोच्च न्यायालयात अनिर्णित असलेल्या प्रश्नावर केलेले आंदोलन समर्थनीय ठरणारे नव्हतेच. आपला हा राजकीय लफंगेगिरीचा धंदा फार काळ चालणार नाही, याची खात्री होताच, आपल्या पिलावळीसह काढता पाय घ्यायचा शहाणपणा चंद्राबाबूंना सुचला, पण लहान मुलासारखे रस्त्यातच हातपाय आपटीत, रडत बेकत ते हैद्राबादला गेले. राजकीय स्वार्थासाठी राजकारणी नेते कोणत्या थरापर्यंत जातात, याचे दर्शन चंद्राबाबूंच्या उधळलेल्या तमाशाच्या फडामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला असे झाले.