Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

पंढरीचे सुख
aikya group
Wednesday, July 21, 2010 AT 12:44 AM (IST)
Tags: Edutioral,  

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी। प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे।
त्रिभुवनी समर्थ एैसे पै तीर्थ। दक्षिणमुख वाहते चंद्रभागा।
सकल संतांचा मुगुटमणी देखा। पुंडलिक सखा आहे तेथे।
चोखा म्हणे तेथे सुखाची मिराशी। भोळ्या भाविकांसी अखंडित।।  
आज आषाढ शुद्ध एकादशी. चंद्रभागेच्या वाळवंटी आणि भूलोकीचे वैकुंठ पंढरीनगरीत लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांचा अथांग जनसागर लोटला आहे. सारी पंढरीच हरिनामाच्या गजराने, टाळ-मृदुंग-पखवाजाच्या निनादाने गर्जते आहे. भगव्या पताकांचे भार खांद्यावर मिरवत वारकऱ्यांच्या दिंड्या श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरात, त्या विठुमाऊलीच्या सुंदर आणि देहभान हरपून टाकणाऱ्या रुपड्याचे दर्शन घ्यायसाठी तासन्‌तास तिष्ठत उभ्या आहेत. पंढरीत जयघोष सुरू आहे तो, विठुरायाच्या नामाचा! गेली अठ्ठावीस युगे वारकऱ्यांचे हे साक्षात परब्रह्म येथे विटेवर आणि कटीवर हात ठेवून आपल्या लाडक्या भक्तांची वाट पाहत उभे आहे. तोही आपल्या भोळ्या-भाबड्या भक्तांच्या दर्शनासाठी आसुसला आहे. आपल्या भेटीसाठीच हे लाखो वारकरी देहू-आळंदी आणि संत भूमीतून, संतांच्या पालख्या घेवून आपल्या भेटीसाठी आले, हे या माऊलीला माहिती आहे. वारकरी आणि विठुरायाच्या एकरुप आणि समरुप भक्तीची ही खूण देव आणि भक्त परस्परांच्या भेटीसाठी असे आसावले आहेत. पंढरीनाथाचे ते सुंदर, मोहक रुप वारकऱ्यांना दिसते. त्याचे दर्शन होताच, वारकऱ्यांनी वारीत सोसलेले सारे कष्ट क्षणार्धात नाहिसे होतात. ते सुंदर सावळे रुप डोळ्यात साठवूनच, वारकरी विठ्ठल मंदिराच्या बाहेर पडतात. त्यांची सारी वृत्तीच,
सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती। रखुमाईच्या पती सोयरिया।
गोड तुझे रुप गोड तुझे नाम। देई मज प्रेम सर्वकाळ।
विठो माऊलीये हाचि वर देई। संचरोनी राही हृदयी माझ्या।
तुका म्हणे काही न मागे आणिक। तुझे पायी सुख सर्व आहे।।
त्या विठ्ठलाचे चरण कमल पाहताच, त्यावर डोके ठेवताच आपला हा देवराया आपल्यासाठी युगानयुगे तिष्ठत उभा राहिला, याची अपूर्वाई वारकऱ्यांना असतेच. वैकुंठ सोडून लाडक्या रुक्मिणीला न सांगता तो भक्त पुंडलिकासाठी वेगे वेगे पंढरीला धावत आला. आपल्या आई-वडिलांच्या सेवेत गर्क असलेल्या पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर निश्चलपणे उभा राहिला. तो तेथेच उभा आहे. आपल्या भक्तासाठी तो वैकुंठालाही गेला नाही. रुक्मिणी त्याला न्यायला आली तरीही तो गेला नाही. कारण, हे सारे वारकरी आणि त्याचे भक्त हेच त्याचे सर्वस्व होते आणि आहे. त्यामुळेच वारकऱ्यांना हा देवाधिदेव आपल्या हृदयीचा आत्मा वाटतो. हाच विठुराया आपल्याला चालवतो, बोलवतो आणि आपण जे काही वेडेवाकुडे गातो, तेही त्याला खूप खूप आवडते, हे वारकऱ्यांना माहिती आहे. वेद, पुराणे, उपनिषदे या साऱ्यांचा अर्क म्हणजे पंढरीराया! त्याचे नामस्मरण केल्यामुळे जन्मांतरीची पापे तर जळतातच पण, आपणही "देव पहावया गेलो, तेथे देवची होऊन ठेलो' अशी वारकऱ्यांची अपार श्रद्धा आहे. या देवाला कोणताही नवस, सायास करावा लागत नाही. भक्तांच्या मनीचे सारे गुज त्याला माहिती आहे. तो सारे ओळखतो. त्याला काही सांगावे लागत नाही पण, तरीही वारकरी आपल्या विठुमाऊलीला भेटायला येतात तेव्हा, "जाऊ देवाचिया गावा। देव देईल विसावा। देवा सांगू सुख-दु:ख। देव निवारील दु:ख।। अशी मनीची भावना घेऊन येतात. पण, जेव्हा हे सावळे सुंदर रुप समोर दिसते तेव्हा मात्र, त्याला काही सांगावे वाटत नाही. तुज पाहता विठ्ठला। भाग शिण गेला। अशी त्यांची स्थिती होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। असा जयघोष करीत, ब्रह्मानंदात न्हाऊन निघतात. पंढरीचा हा सोहळा देवांनाही पहायला मिळत नाही, ते भाग्य श्री केशवाच्या भक्तांना पंढरीनाथाच्या कृपेनेच मिळते.
धाव घाली विठो आता...
हे पंढरीराया तुला आम्ही काय सांगणार? तू साऱ्या त्रिभुवनाचा निर्माता आणि पालक! तू सुखाचा सागर! तुझ्यापाशी आम्ही काही मागावे असे काही नाही. तुझ्या कृपेनेच आमचा अवघाचि संसार सुखाचा होईल असा विश्वास आम्हाला आहेच. गेल्या वर्षी मेघराजाच्या अवकृपेने महाराष्ट्रावर कराल दुष्काळाची छाया पडली. यावर्षी पाऊस झाला, राज्यातल्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि पंढरीची वाट धरली. दरवर्षी आषाढीच्या वारीत पावसाच्या मुसळधार सरींनी चिंब भिजत, तुझ्या नामाचा जयघोष करीत वारकरी तुझ्या दर्शनाच्या ओढीने येतात. यावेळी मात्र आळंदी आणि देहूहून ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबारायांच्या पालख्या निघाल्या. वाटेत अन्य संतांच्या दिंड्या, पालख्यांसह या भक्तीयात्रेत सामील झाल्या. लाखो वारकऱ्यांचा भक्तीसागर, तुला भेटायसाठी मजल-दरमजल करीत श्री क्षेत्र पंढरीत आला. पंढरी म्हणजे भक्तीची पेठ. ती तुझे नाव घेतच लुटायची! फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही। अशी वारकऱ्यांची भावना. तुझे नामसंकिर्तन करता करता तहान-भूकही हरपते. आता तुझे दर्शन झाले. आम्ही कृतकृत्य झालो. कळसाचे दर्शन घेऊन आम्ही आता पुन्हा तुझे गोड नाव घेतच आमच्या गावी परतत आहोत. देवा आम्हाला काळजी आहे, ती आमच्या धरती मातेची. आम्ही जे पेरले, जे पीक उगवले, ते तारायसाठी आता पाऊस हवा आहे. मेघराजा तुझा चाकर. तूच त्याला आज्ञा दे आणि आम्ही परततानाच पावसाच्या सरींनी भिजवत आमच्या गाव पंढरीत तू आम्हाला पोहचव. देवा आता पाऊस पाड! आमचे मागणे फार काही नाही. पाऊस पाडलास तर आमचे अवघे जीवन सुखी आणि समाधानी होईल. तुझ्या कृपेने आमचा संसार धन्य धन्य होईल. आमचा हा हट्ट तू पुरवशील, हे आम्हाला माहिती आहे. तरीही आमचे गाऱ्हाणे तू आमची माऊली म्हणून तुला सांगायलाच हवे, म्हणून सांगतो आहोत. हे देवराया, आता काय सांगू. आमचे राजकारणी स्वार्थी झाले. लोकसेवेच्या नावाखाली ते सत्तेच्या कुरणात मुक्तपणे चरायला सोकावले. त्यांना आमची आठवण फारशी येत नाही. सत्तेची धुंदी त्यांना चढली आहे. महागाईमुळे सामान्य जनतेची झालेली होरपळ त्यांना दिसत नाही. महागाई आणि भाववाढ कमी करू, अशी साखरपेरणीची भाषा करण्यापलिकडे त्यांनी काहीच केलेले नाही. ते काही करतील अशी आम्हाला आशाही वाटेनाशी झाली आहे. हे वैकुंठनाथा तू सारे पाहतो आहेस. वैकुंठ सोडून तू फक्त आमच्या सुखासाठी पंढरीत आलास. तुझ्या मुलाबाळांना दोन घास सुखाचे मिळावेत, या परते आमचे काही मागणे नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान। हे आम्हाला तुझे नाम घेता घेता उमजले. पण, देवा संसाराची ही जबाबदारी आम्हाला कशी टाकून देता येईल. अवघाचि संसार सुखाचा करा। हेच तर आमच्या संतांनी सांगितले. देह जाओ अथवा राहो। पांडुरंगी निज भावो। हा आमचा सुखाचा मंत्र! तो आम्ही जपतोच आहोत. हे पंढरीनाथा आमच्या राज्यकर्त्यांना चांगली बुद्धी दे. जनतेमुळेच त्यांना सत्ता मिळाली, हे त्यांना तूच सांग, म्हणजे त्यांचे पाय जमिनीवर येतील. आमच्या सुख-दु:खाची जाणीव त्यांना होईल. ते सर्वार्थाने लोकहिताचा कारभार करतील आणि आम्हाला चिंतामुक्त भावनेने तुझे नामस्मरण करता येईल. हे देवराया आता आमचा अंत पाहू नकोस. हे विठो आता धावून ये, आमच्या संकटांचे निवारण कर. आम्ही तुझ्याशिवाय हे कुणाला सांगणार.
हे श्रीरंगा, हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: