Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  अग्रलेख  >>  बातम्या

मानवी चुकीचे बळी...
aikya group
Tuesday, July 20, 2010 AT 01:32 AM (IST)
Tags: editorial,  
पश्चिम बंगालमधल्या सैंथिया रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या प्रवासी रेल्वे गाडीवर पाठीमागून आलेल्या प्रवासी रेल्वे गाडीने जोरदार धडक दिल्याने, झालेल्या भीषण अपघातात 80 हून अधिक जणांचे बळी गेले, ते मानवी चुकीमुळेच! अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी रेल्वेचे रुळ उखडल्यामुळे मिदनापूर जिल्ह्यात ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रेल्वे रुळावरुन  घसरल्यामुळे झालेल्या अपघातात शंभर लोक ठार झाले होते. हा अपघात नक्षलवाद्यांनी केलेल्या घातपातामुळे झाल्याचे कारण सांगत, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जींनी आपल्यावरची जबाबदारी झटकून टाकायचा प्रयत्न केला होता. या अपघाताची जबाबदारी मात्र त्यांना टाळता येण्यासारखी स्थिती नाही. कारण स्टेशनवर थांबलेल्या प्रवासी रेल्वेगाडीवर, त्याच प्लॅटफॉर्मवर दुसरी प्रवासी रेल्वे आली, तीच चुकीचा सिग्नल दिल्यामुळे! सैंथिया रेल्वे स्टेशनवर थांबलेली भागलपूर-रांची-वनांचल एक्स्प्रेस थोड्याच वेळात सुटणार होती. ही रेल्वे पाच तास उशिरा या स्टेशनवर पोहोचली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ही गाडी उभी आहे, याची माहिती स्टेशन मास्तर, तांत्रिक कर्मचारी आणि सिग्नलमनलाही होती. तरीही त्याने चुकीचा सिग्नल देत रेल्वेचे रुळ बदलून न्यू कुचबिहार-उत्तरबंग एक्स्प्रेसला त्याच प्लॅटफॉर्मवर जाऊ दिल्यामुळेच, हा अपघात घडला, हे स्पष्ट आहे. सोमवारी पहाटे दोन वाजता वनांचल एक्स्प्रेसला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या उत्तरबंग एक्स्प्रेसने जोरदार धडक दिल्यामुळे, वनांचल एक्स्प्रेसचे सहा डबे अक्षरश: हवेत उडाले. एक डबा तर उड्डाण पुलाच्या दिशेने फेकला गेला. डब्यांचा आणि रेल्वे इंजिनचा चेंदा मेंदा झाल्यामुळे, 80 प्रवासी जागच्या जागी ठार आणि 150 च्यावर प्रवासी गंभीर जखमी झाले. कोलकाता शहरापासून 190 किलोमीटर दूर असलेल्या या स्टेशनच्या परिसरात मोठे रुग्णालय नसल्यामुळे, जखमींना उपचारासाठी नेताना प्रचंड गोंधळ झाला. मिळेल त्या वाहनाने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले. वास्तविक उत्तरबंग एक्स्प्रेसही याच स्टेशनवर थांबणार होती. त्याचाच अर्थ या गाडीसाठी दुसरा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. प्लॅटफॉर्म चारवर ही गाडी थांबवायची होती, तर सिग्नलमनने वनांचल एक्स्प्रेस स्टेशनमधून सुटल्याची खात्री करुन घ्यायला हवी होती. वनांचल स्टेशनवरच उभी असल्याने, सिग्नलमनने उत्तरबंगच्या इंजिन चालकाला गाडी थांबवायचा सिग्नल दिला असता तर, ती गाडी स्टेशनच्या बाहेरच थांबली असती आणि हा अपघातही टळला असता. सिग्नल तोडून उत्तरबंगच्या इंजिन चालकाने गाडी पुढे नेली त्यामुळे अपघात झाला, या दाव्यात काही तथ्य आढळत नाही. रेल्वे खात्यामार्फत नेहमीप्रमाणेच या अपघाताची चौकशी  होईल, अपघाताचे कारणही शोधले जाईल, यापुढच्या काळात असे अपघात होणार नाहीत, याची दक्षता-काळजी रेल्वे खाते घेईल, अशी ग्वाही ममता बॅनर्जी देतील. पण मानवी चुकीमुळे बळी गेलेल्या 80 जणांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, त्या मृतांची कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली, ती हानी काही लाखो रुपयांची नुकसान भरपाई देवून भरुन येणारी नाही. हा अपघात झाला तेव्हा कोलकात्यात नेहमीच तळ ठोकून असलेल्या ममता बॅनर्जी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघात घडण्यामागे आपल्याला काही शंका येते, असे त्या म्हणाल्या आहेत. त्यांची ही शंका कोणती? हे लवकरच समजेल!  
सुरक्षिततेची फक्त हमी
"सुरक्षित यात्रा के लिए रेल्वे की शुभकामनाएँ', अशी उद्‌घोषणा रेल्वे स्टेशनवर वारंवार केली जाते. रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा द्यायला आणि त्यांच्या सुरक्षिततेला रेल्वे खाते सर्वाधिक अग्रक्रम देत असल्याचा दावाही ममता बॅनर्जी करतात. पण प्रत्यक्षात मात्र, ही घोषणा फक्त प्रवाशांना दिलासा देण्यापुरतीच मर्यादित आहे की काय? अशी परिस्थिती वाढत्या रेल्वे अपघातांमुळे निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षात मोठ्या अपघातांची संख्या कमी झाली आणि अपघातात ठार होणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली असली तरी, रेल्वेचा प्रवास पूर्णपणे सुरक्षित राहिलेला नाही. छोट्या अपघातांची संख्या कमी करण्यात रेल्वेला अद्यापही यश आलेले नाही. गेल्या वर्षी मनुष्यरहित रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे धडकल्यामुळे रेल्वे अपघातात ठार झालेल्यांची संख्या 70 टक्के होती. रेल्वेचे साठ टक्के अपघात हे तांत्रिक दोषामुळे होतात. तर सिग्नल यंत्रणा निकामी झाल्याच्या घटनांची संख्या दोन वर्षांपूर्वी एक लाख चाळीस हजाराच्या आसपास होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिग्नल बंद का पडतात आणि हे प्रमाण शून्यावर कसे आणता येईल, याचा गंभीर विचार रेल्वे मंत्रालयाने करायला हवा. मनुष्यरहित रेल्वे क्रॉसिंगवर गेटमनच्या नेमणुका करण्यासाठी रेल्वे खाते गंभीर असल्याची ग्वाही सरकारने दिली होती. पण, त्यासाठी आवश्यक असलेला निधी मात्र रेल्वे मंत्रालयाला उपलब्ध झाला नसावा. त्यामुळेच अशा रेल्वे  क्रॉसिंगची संख्या घटलेली नाही. दिलेला सिग्नल तोडून इंजिनचालक रेल्वे पुढे नेतात आणि अपघात होतात, असेही कारण सांगितले जाते. सैंथिया रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघाताचे प्राथमिक कारणही हेच सांगितले जाते. ज्या उत्तरबंग एक्स्प्रेसचे इंजिन वनांचल एक्स्प्रेसवर धडकून हा अपघात झाला, त्या रेल्वेचा इंजिनचालकही ठार झाल्यामुळे नेमके काय घडले, हे समजणे तसे अवघड झाले आहे. रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या इंजिन चालकांसाठी विशेष काळजीचे प्रशिक्षण रेल्वे खात्याने द्यायला हवे. संपूर्ण भारतात रेल्वेचे स्वत:चे टेलिफोनचे जाळे आहे. स्वयंचलित सिग्नल यंत्रणाही अस्तित्वात आहे. एकाच मार्गावरच्या दोन स्टेशनच्या दरम्यान सतत संपर्कही असतो. असे असतानाही, अपघात का होतात? याचा विचार रेल्वे खात्याने करायला हवा. रेल्वेचा प्रवास म्हणजे सुरक्षिततेचा असा विश्वास रेल्वे प्रवाशांना वाटतो. तो चुकीचाही नाही. पण, गेल्या काही वर्षात, विशेषत: दोन वर्षात मात्र या विश्वासाला ग्रहण लागले आहे. धावत्या रेल्वेत, रेल्वे सुरक्षा पोलीस असतानाही दरोडे पडतात, प्रवाशांना मारहाण केली जाते. प्रवाशांनी चोऱ्या आणि दरोड्यांची तक्रार करुनही या घटनांचा तपास संथ गतीने होतो. काही वेळा रेल्वे स्टेशनवरच रेल्वे प्रवाशांना लुबाडायच्या घटना घडतात. नक्षलग्रस्त भागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांना सशस्त्र नक्षलवाद्यांकडून हल्ले होण्याचा धोका असल्याची भीती वाटते. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्री प्रवाशांची सुरक्षिततेची अधिक काळजी घेवू, या पलिकडे काही आश्वासन देत नाही. आता या अपघातानंतर तरी, रेल्वेचा प्रवास सर्वार्थाने सुरक्षित होण्यासाठी परिणामकारक सुधारणा अंमलात यायला हवी. 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: