
दुबई, दि. 3 (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयसीसी वनडे फलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावल्यानंतर महिला संघातील फलंदाज मिथाली राजनेही आयसीसी वनडे महिला फलंदाजांच्या रॅंकिंग-मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. गोलंदाजांमध्ये हा मान झुलन गोस्वामीने आधीच मिळवला आहे.
मिथालीने नंबर वन मिळवला असला तरी हे स्थान फार काळ राहील, अशी शक्यता नाही. मिथालीला या स्थानावरुन खाली खेचण्याची संधी इंग्लंडच्या क्लेअर टेलरला आहे. इंग्लंडचा संघ आधी आयर्लंडशी एक एकदिवसीय सामना खेळणार असून नंतर न्यूझीलंडशी पाच साम-न्यांच्या मालि-केत दोन हात करणार आहे. सध्या क्लेअर तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र या दोन मालिकां-मध्ये चांगली कामगिरी केल्यास ती मिथाली राजचे अव्वल स्थान हिरावून घेईल.
गोलंदाजांच्या रॅंकिंगमध्ये भारताची झुलन गोस्वामी अव्वल असून ऑस्ट्रेलियाची लिसा स्थळेकर तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडची कॅथरिन ब्रंट सहाव्या क्रमांकावर आहे. ब्रंट व गोस्वामी यांच्यात केवळ 65 गुणांचा फरक आहे. स्थळेकरचे तिसरे स्थान पटकावण्यासाठी 25 वर्षीय ब्रंटला आता केवळ काही बळींची आवश्यकता आहे.
ब्रंटच्या संघ सहकारी होली कॉल्व्हिन, निकी शॉ आणि लारा मार्श या अनुक्रमे सहाव्या, सातव्या व आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांनाही आपले रॅंकिंग सुधारण्याची संधी आहे. अष्टपैलू महिला खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाची शेली निश्के ही अव्वल स्थानावर आहे.