Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  दिनविशेष  >>  बातम्या

अफजल गुरुचे पाठीराखे
ऐक्य समूह
Tuesday, June 08, 2010 AT 01:03 AM (IST)
Tags: Vishesh Lekh
भारतीय लोकशाहीच्या पवित्र मंदिरावर, संसदेवर भीषण-सशस्त्र हल्ला चढवणाऱ्या दहशतवाद्यांचा सूत्रधार अफजल गुरुला झालेल्या फाशीची अद्यापही अंमलबजावणी का होत नाही? असा रोकडा सवाल विरोधी पक्षांचे नेतेे केंद्र सरकारला गेली चार वर्षे वारंवार करतात. त्याने राष्ट्रपतींच्याकडे केलेल्या दयेच्या अर्जाचा निर्णय अद्याप झालेला नसल्याने, त्याला फाशी देता येत नाही, असे कारण केंद्र सरकार देत राहिले. पण, त्याच्या दयेच्या अर्जावर केंद्र सरकारकडून मागितलेली शिफारसच राष्ट्रपतींच्या कडे अद्यापही पोहोचलेली नाही. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांनीही, अफजल गुरुच्या दयेचा अर्ज आपल्याकडे निर्णयासाठी आला नसल्याचा खुलासाही केला होता. दोन महिन्यांपूर्वी अफजलच्या फाशीचे प्रकरण पुन्हा गाजायला लागले ते, या प्रकरणी 16 स्मरणपत्रे पाठवूनही दिल्ली सरकारने अफजलच्या फाशीबाबत काहीही शिफारस केली नसल्याचे उघडकीस आले. प्रसारमाध्यमात याबाबत पुन्हा उलटसुलट चर्चा सुरु झाली. दिल्ली सरकारने अफजलला फाशी द्यावी, अशी शिफारस करणारे पत्र केंद्र सरकारला अलिकडेच पाठवले आहे. परंतु दिल्ली सरकारने ही शिफारस करायची टाळाटाळ का केली, हा मुळ मुद्दा कायमच राहिला होता. दिल्ली सरकारकडून स्मरण पत्राचे उत्तरच मिळत नसल्यामुळे अफजलच्या फाशीवर केंद्र सरकारचे गृहमंत्रालय काहीही निर्णय घेऊ शकत नाही, असे संशयाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली सरकारच्या चालढकलीच्या धोरणामुळेच अफजल गुरू आतापर्यंत जिवंत राहिला, असे जनतेला वाटत होते.
पण दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी उपग्रह वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अफजलला जिवंत ठेवण्यात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील हेच जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगून टाकल्याने, अफजलचे पाठीराखे कोण होते? हे आता चव्हाट्यावर आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय राज्य सरकारला अफजलच्या फाशीच्या अर्जावर शिफारस करायसाठी वारंवार स्मरणपत्रे पाठवित असे. पण, तुम्ही उत्तर देवू नका, असा आदेश, शिवराज पाटील दिल्ली सरकारला देत असत, त्यामुळे चार वर्षात पाठवलेल्या सोळा स्मरणपत्रांना दीक्षित यांच्या सरकारने काहीही उत्तर दिले नव्हते. याबाबत आल्यावर राजकीय दबाव होता का? या प्रश्नावर दीक्षित यांनी स्पष्टपणे काही उत्तर दिले नाही. आपण या संदर्भात काहीही सांगू शकत नाही. पण, पत्राचे उत्तर देण्यास घाई करु नका, असे सांगितले जात असे, अशी कबुलीच त्यांनी देवून टाकली. त्यांनी शिवराज पाटील यांचे नाव प्रत्यक्षपणे घेतलेले नाही. पण, तेच गृहमंत्री असताना, अफजलच्या फाशीचे प्रकरण असे लोंबकळत राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. आता दिल्ली सरकारने गृहमंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात अफजलला फाशी द्यावी, अशी शिफारस केली असली तरी, त्याला फाशी दिल्यास, निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येचा मुद्दाही नमूद केला आहे. राष्ट्रद्रोही अफजलला जिवंत ठेवून, अल्पसंख्याकांची मते कॉंग्रेसला मिळावित, हाच शिवराज पाटील यांचा हेतू होता, अशी अप्रत्यक्ष कबुलीच शीला दीक्षित यांनी दिली आहे. अफजल गुरु, कॉंग्रेस पक्षाचा कोण लागतो? याचे हे उत्तर होय!
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: