Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  दिनविशेष  >>  बातम्या

पिण्याच्या पाण्यासाठी शाहूनगरी व्याकूळ
aikya group
Sunday, April 18, 2010 AT 01:58 AM (IST)
Tags: local news

सातारा, दि. 17 : खंडित वीजपुरवठ्यामुळे सातारा शहरासह परिसरातील शाहूनगर, शाहूपुरी व अन्य उपनगरांना शनिवारी पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शहरातील काही भागाला नगरपालिकेने टॅंकरने पाणीपुरवठा केला. मात्र शाहूपुरी, शाहूनगर, सदरबझार, गोडोली, कोडोली, खेड, माहुली, संगमनगर, कृष्णानगर या उपनगरातील नागरिकांना पाणीटंचाईची मोठी झळ सोसावी लागली. कासच्या पाटात आलेला गाळ, झाडांचा पाला आणि अन्य साहित्य बाहेर काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे सहा कर्मचारी सकाळीच कासला पाठविण्यात आले. त्यानंतर कासचा पाणीपुरवठा सुरळीत झाला. मात्र उपनगरांना अजून दोन दिवस कमी दाबाने व अल्प पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की शुक्रवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे  ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळले. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे जीवन प्राधिकरणाच्या माहुली येथीलउपसा केंद्र येथून पाणी उपसा झाला नाही.  शहापूर योजनेतून कमी दाबाने पाणी उपसा झाला.
तसेच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कासच्या पाटात माती व अन्य साहित्य आले. त्यामुळे पाटातून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठाझाला नाही. परिणामी शहरातील प्रतापगंज पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, मल्हार पेठ, गुरुवार, केसरकर, दुर्गा पेठेत पाणीपुरवठा झाला नाही. या भागापैकी काही ठिकाणी नगरपालिकेने टॅंकरने पाणीपुरवठा केला.
गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरातील काही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत. मात्र पालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशातच खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा करता येत नसल्याचे आयते निमित्तही पालिका प्रशासनाला मिळाले आहे. दोन्ही आघाड्यांची एकत्रित सत्ता सातारा पालिकेत आहे. विरोधी गटाचे पालिकेत नावालाच अस्तित्व आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या मूलभूत अशा पाणीप्रश्नाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीही सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्याझळा सातारकरांना बसत आहेत. मात्र आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय पालिकेकडून  टॅंकरनेही पाणीपुरवठा केला जात नाही, असे नागरिकांनी सांगितले. जिथे सुरळीत पाणीपुरवठा होत नाही अशा ठिकाणी पालिकेने स्वत:हून टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. मात्र यासंदर्भात कितीही तक्रारी झाल्या तरी पालिका प्रशासनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.
शहरातील भागात पाणीटंचाई झाल्यानंतर किमान टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची सोय आहे. मात्र शहर परिसरातील शाहूपुरी आणि शाहूनगर भागात पाणीटंचाईतून नागरिकांना सोडविण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे या भागाला पाणी आले नाही, तर जीवन प्राधिकरणाच्या नावाने खडे फोडण्याशिवाय अन्य काही पर्याय त्यांच्यासमोर राहत नाही. गेल्या दोन दिवसापासून शाहूपुरी व शाहूनगर भागाला पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या सदरबझार, गोडोली, कोडोली, शाहूपुरी, खेड, माहुली, संगमनगर, शाहूनगर येथील ग्राहकांना अजून दि. 18 व 19 एप्रिल या दोन दिवसाच्या कालावधीत कमी दाबाने व अल्प पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी दि. 16 व 17 रोजी वारंवार विद्यतु पुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे माहुलीउपसा केंद्रातील पाणी उचलणे अत्यंत अवघड झाले आहे. या खात्याचा पाणीपुरवठा पूर्णपणे विद्युत पुरवठ्याशी निगडित असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यास  नाइलाजाने ग्राहकांना पाणीपुरवठा कमी प्रमाणात व अल्प दाबाने होण्याची शक्यता आहे. सर्व ग्राहकांनी काटकसरीने पाणी वापर करुन खात्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता कागलकर यांनी केले आहे. तसेच ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.
शहरातील पाणीपुरवठा आज सुरळीत होईल
कासच्या पाटातील गाळ व पालापाचोळा बाजूला काढून पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. खंडित वीजपुरवठाही सुरळीत झाल्याने रविवारी सातारा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता साठे यांनी दिली.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: