राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्याची तयारी
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:24 AM (IST)
वाई (यशवंतराव चव्हाणनगर), दि. 12 : कॉंग्रेसचे नेते किती दिवस कुबड्याघ्यायच्या असे सांगत स्वतंत्र निवडणुका लढवण्याची भाषा सातत्याने वापरत असतात. मात्र आमचीही स्वतंत्र लढायची तयारी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. कार्यकर्त्यांनीही आजपासूनच पुढच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्या लागतील अशा प्रकारे तयारी करावी, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. छगन भुजबळ यांनी केली.
वाई येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. मधुकर पिचड, गृहमंत्री ना. आर. आर. पाटील, ऊर्जामंत्री ना. अजित पवार, जलसंपदामंत्री ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, दुग्ध विकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने, लक्ष्मणराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. विक्रमसिंह पाटणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. भुजबळ पुढे म्हणाले, गेल्या अकरा वर्षात शरद पवार यांनी केलेल्या अथक परिश्रमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उभा राहिला आहे. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यांचे दिल्लीतील महत्त्व संपले. मात्र पवारसाहेबांचे दिल्लीतील महत्त्व कधीही संपलेले नाही. उलट ते कायम वाढलेले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले आणि तोच वारसा पवारसाहेबांनी पुढे चालवला. राष्ट्रवादीची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर रोवली आणि रुजवली. सागराला ज्याप्रमाणेभरती-ओहोटी असते. त्याचप्रमाणे निवडणुकांमध्ये अप आणि डाऊन असते. त्यामुळे राष्ट्रवादी संपली अशी ओरड कोणीही करु नये. राष्ट्रवादीची ताकद महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील अनेक राज्यात वाढलेली आहे. देशातील काही राज्यांमध्ये आमचे खासदार आणि आमदार निवडून आलेले आहेत.
निवडणुका आल्यानंतर काही कॉंग्रेसचे नेते कुबड्या कशाला घ्यायच्या अशी भाषा वापरतात. स्वतंत्र निवडणुका लढविण्याची घोषणा करतात. ज्यांचीउंची नाही तोही पवारसाहेबांवर बोलू लागतो. मात्र प्रत्येकाने आपल्याउंचीप्रमाणे बोलावे. 1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर आम्ही स्वतंत्रच निवडणुका लढवल्या होत्या हे कोणीही विसरु नये. धर्मनिरपेक्ष मतांची फूट होवू नये यासाठी आम्ही आघाडी केली. प्रत्येक वेळी समाजातील तळागाळाच्या लोकांचा विचार करुन आम्ही माघार घेतो. मात्र त्याचा अर्थ आमची ताकद नाही असे कोणी समजू नये. स्वतंत्र निवडणूका लढविण्याची तयारी आम्हीही ठेवलेली आहे. आघाडी करायची असेल तर सन्मानाने करा अन्यथा वेगळ्या पर्यायाचा विचार आमच्याकडेही तयार आहे.
राज्यातील इतर पक्षांच्या तुलनेत आपण कोठेही कमी नाही. मात्र आपण आपसातली कलाकारी थांबवली पाहिजे. आपण काही निवडणुकांमध्ये 100 टक्के पक्षांबरोबर असतो, तर काही निवडणुकांमध्ये आपली भूमिका पक्षाच्या उलट असते. एकमेकांचे पाय ओढण्याची भूमिका आपण घेत असतो. एकमेकांचे पाय ओढण्याचे काम आपण थांबवले पाहिजे. एकमेका सहाय्य करू, धरु अवघे सुुपंथ अशी भूमिका जर आपण घेतली तर आपला पक्ष राज्यातील क्रमांक एकच पक्ष होण्यास वेळ लागणार नाही. सगळेच मला पाहिजे, अशी भूमिका कोणी घेता कामा नये. सगळेच काही मीच करेन आणि दुसऱ्याला काहीही देणार नाही असे विचारही बाजूला ठेवले पाहिजेत. पक्षातील संघटनेच्या आणि सत्तेतही ओबीसी, दलित, आदिवासी यांना सामावून घेवून आपण वाटचाल केली पाहिजे. पक्षात आणि सत्तेत त्यांना अधिकार दिले पाहिजेत. कारण निवडून येण्यासाठी सगळ्यांची मते लागतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पवारसाहेबांवर टीका करण्यासाठी विरोधक मुद्दे शोधत असतात. पवारसाहेब क्रिकेटचे अध्यक्ष झाल्यावर लगचेच त्याची चर्चा होते. मात्र ते क्रिकेटबरोबर कुस्ती आणि कबड्डी संघटनेचेही अनेक वर्षे अध्यक्ष होते. कबड्डी जगाच्या नकाशावर आणण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट महत्त्वाचे आहेत. पवारसाहेबांएवढा दूरदृष्टीचा नेता संपूर्ण महाराष्ट्रात नाही. जशी ते गोलंदाजी करतात तशीच ते फटकेबाजीही करतात. त्यांच्या फटक्यांनी अनेकांना घायाळ केले आहे. त्याचा अनुभव येथे बसलेल्यांनी घेतला आहे.
प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड म्हणाले, गावपातळीपासून आपल्याला संघटन करायला हवे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस हा भावनेवर चालणारा पक्ष नाही. स्वत:ची मुले इंग्रजी शाळेत घालायची आणि मराठीच्या मुद्यावर भावनेचे राजकारण खेळायचे अशी आपल्या पक्षाची पध्दत नाही. भावनेचे राजकारण जास्त काळ टिकत नाही. आपला पक्ष विकासात्मक कामे करुन पुढे आला आहे. राज्याच्या भागात अनेक ठिकाणी फिरल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री चांगले काम करत असल्याची ओरड इतर पक्षातून होते. त्यावेळी चांगले वाटते. राष्ट्रवादीचे मंत्री जनतेची, कार्यकर्त्यांची कामे करतात. त्यांना नाउमेद करत नाहीत. त्यामुळे हा पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विकासात्मक कामे करुनच आपल्याला वाटचाल करायची आहे. विकासात्मक कामे जनतेपुढे मांडून आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत. आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकून स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
लक्ष्मणराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष श्रीमंत दादाराजे खर्डेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. ज्योती जाधव,उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, शशिकांत पिसाळ, बाळासाहेब भिलारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.