क्लार्कची वाटचाल वॉर्नच्या मार्गाने : मायकेल स्लेटर
pti news
Saturday, March 13, 2010 AT 02:50 AM (IST)
मेलबर्न, दि. 12 (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद भूषविण्याची फिरकीचा जादुगार शेन वॉर्नची इच्छा कारकिर्दीच्या अखेरपर्यंत अपुरीच राहिली. आता ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार मायकेल क्लार्कही त्याच मार्गाने वाटचाल करत असल्याचा धोक्याचा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मायकेल स्लेटर याने दिला आहे.
क्लार्कची ओळख लारा बिंगलशी स्लेटरनेच करुन दिली असली तरी मैदानाबाहेर घडणाऱ्या नाट्यामुळे क्लार्क दबून गेला तर तो ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवू शकणार नाही, असे त्याला वाटते. लारा बिंगलच्या फियास्कोबद्दल स्लेटरने चर्चा केली नाही; परंतु मैदानाबाहेरील घडामोडी क्लार्कने व्यवस्थित हाताळल्या पाहिजेत, या मतावर तो ठाम राहिला.
तो म्हणाला, क्लार्कचे मैदानाबाहेरील आयुष्य वृत्तपत्रांचा मथळा बनत असेल तर तो ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकणार नाही. उपकर्णधारासारख्या महत्त्वाच्या खेळाडूला यापूर्वी कधीही दौरा अर्ध्यात सोडून जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. ऑस्ट्रेलियासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्लार्कची इच्छा असेल तर त्याने आपले लक्ष विचलित होऊ देणे योग्य नाही.
ऍशेस मालिकेत पहिल्यांदाच नेतृत्व करणाऱ्या ऍलन बोर्डरकडे घरी जाण्याची परवानगी मागण्याचे धाडस त्यावेळी कोणाकडेही नव्हते. यष्टिरक्षक इयान हिलीला त्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम व्हिडीओवर पहावा लागला होता, अशी आठवण स्लेटरने सांगितली.