दक्षिणेतील नव्या भागाने यशवंतरावांचा वारसा जपला
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 11:06 PM (IST)
उंडाळे, दि. 13 : कराड दक्षिणेत नव्याने समाविष्ट झालेल्या भागाने स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय विचारांचा वारसा आहे. तोच वारसा जपण्याचे काम मतदारांनी केले. व्यक्तीनिष्ठ द्वेषाच्या राजकारणाला विरोध करुन विधानसभा निवडणुकीत सुसंस्कृत राजकारणाला साथ केली असल्याचे प्रतिपादन आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले.
खोडशी, ता. कराड येथे 5 लाख रुपये खर्चाच्या समाजमंदिर कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब पाटील होते. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक मोहनराव पाटील, सेवा सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ भोसले, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तानाजीराव नलवडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता पाणदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. उंडाळकर म्हणाले, सन 1980 पासून आपण कराड दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व करत आहोत. या कालावधीत कधी आपण कराड उत्तर, दक्षिण असा भेदभाव केला नाही. 40 वर्षांच्या राजकारणात खोडशी गावाचा आणि माझा चांगला संबंध आहे. उत्तरेतील खोडजाईवाडी गाव ही दक्षिणेतच आहे, असे मानून सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले. या कालावधीत अनेक जणांनी विरोध केला, किती आले किती गेले याचा विचार न करता विकासाची आघाडी सातत्याने पुढे नेली.
कराड दक्षिण राज्यात विकासाचा आयडॉल बनवला. हे काम करताना प्रशासन व जनतेचे मोठे सहकार्य लाभले. खोडशीसारख्या सदन गावाची रस्त्याची अवस्था पहाता शरम वाटते. दक्षिणेतील वाडी-वस्त्यातही सुंदर रस्ते आहेत. याच धर्तीवर खोडशीच्या रस्त्यांनाही तात्काळ निधी उपलब्ध करुन अशी घोषणा त्यांनी केली. खोडशी गावाला राजकीय, सामाजिक वारसा असल्याने स्वच्छ बनवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी केले. विकासकामासाठी गावची एकी महत्वाची आहे. तुमची फूट हेच विरोध पुढाऱ्यांचे भांडवल असल्याने यापुढे जनतेने काम न करणाऱ्या पुढाऱ्यांना जाब विचारावा. तसे केल्यास लोकशाही टिकेल.
यावेळी जगन्नाथ भोसले, लालासाहेब पाटील, पाणदरे यांची भाषणे झाली. जयसिंग तांबे यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले. यावेळी डॉ. थोरात, सुधीर एकांडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.