भाऊसाहेब महाराज क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:49 AM (IST)
सातारा, दि. 12 : आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे मित्रसमूहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्व. आ. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज टेनिस बॉल दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे गुरुवारी उत्साहात उद्घाटन झाले. यावेळी पत्रकार संघ व नगरपरिषद संघ यांच्यात झालेल्या मित्रत्वाच्या सामन्यात नगरपरिषद संघाने दणदणीत विजय मिळवला.
या स्पर्धेचे उद्घाटन आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा सौ. वैशाली महामुनी, उपनगराध्यक्षा सौ. सुजाता राजेमहाडिक, नगरसेविका सौ. सुजाता भोसले, सौ. कविता देगावकर, नगरसेवक अविनाश कदम, गोपाळ औताडे, मासचे शिरीष खुटाळे, आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे मित्रसमूहाचे फिरोज पठाण, भालचंद्र निकम, अमित महिपाल, राजेंद्र गिरीगोसावी, मान्यवर व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर नगरसेवक व आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे मित्रसमूह यांचा संयुक्त नगरपरिषद संघ आणि सातारा पत्रकार संघ यांच्यात मित्रत्वाचा सामना झाला. या सामन्यात नगरपरिषद संघाने पत्रकार संघाचा 5 गडी राखून दणदणीत पराभव केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पत्रकार संघाने निर्धारित 8 षटकात 2 बाद 52 धावा केल्या. नगरपरिषद संघाला जास्त गडी बाद करता आले नसले तरी त्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन पत्रकार संघाच्या फलंदाजांना फटकेबाजीची फारशी संधी दिली नाही.
नगरपरिषद संघाने ही धावसंख्या 7 व्याच षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात पार केली. पत्रकार संघाच्या गोलंदाजांनी पहिल्या 4 षटकात अचूक गोलंदाजी करुन फक्त 24 धावा दिल्या. मात्र नंतर नगरपरिषद संघाने केवळ 2.3 षटकातच उर्वरित 28 धावा चोपून विजय मिळवला. या सामन्यात भालचंद्र निकम यांनी 1 षटकार व 3 चौकारांसह सर्वाधिक 30 धावा केल्या. नगरपरिषद संघात नगरसेवक अविनाश कदम, रवींद्र ढोणे, अमोल मोहिते, फिरोज पठाण, भालचंद्र निकम, सागर राजेमहाडिक, अमित महिपाल, श्रीकांत भणगे, राजेंद्र गिरीगोसावी यांचा समावेश होता. पत्रकार संघात विनोद कुलकर्णी, दीपक दीक्षित, अमर मोकाशी, हरिष पाटणे, प्रवीण जाधव, सचिन धुमाळ, सचिन हांडे, संपत जाधव, सिध्दार्थ लाटकर, स्वरुप जानकर, संतोष पवार, विजय मांडके यांचा समावेश होता.