प्रतापसिंहनगरातील महिलेचा मृत्यू गॅस्ट्रोमुळे ?
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:32 AM (IST)
सातारा, दि. 12 : दूषित पाण्यामुळे प्रतापसिंहनगर येथे गेल्या तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ सुरु असून गुरुवारी रात्री 11 वाजता या साथीमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना सौ.हिराबाई नामदेव कांबळे (वय 56) या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे शुक्रवारी रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी प्रतापसिंहनगर येथील दूषित पाण्याची समस्या तसेच जिल्हा परिषदेच्या योजनेतून प्रतापसिंहनगरला पाणीपुरवठा आणि मयत सौ. कांबळे यांच्या मृत्यूची चौकशी करुन कुटुंबाला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव मावळला.
दरम्यान, सायंकाळी 5 वाजता सौ. कांबळे यांच्यावर संगममाहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, गॅस्ट्रोसदृश लागण झालेल्या 154 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून सुमारे 17 रुग्ण अद्यापही सलाईनवर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रतापसिंहनगर येथे गेले तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ सुरु आहे. गुरुवारी रात्री 7.30 च्या दरम्यान सौ.हिराबाई नामदेव कांबळे या महिलेला जुलाब सुरू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा रात्री 11 वाजता मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना प्रतापसिंहनगर येथील ग्रामस्थांना समजताच त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्याने रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले तर काही संतप्त कार्यकर्त्यांनी सौ. कांबळे यांचा मृतदेह ताब्यात न घेता तो जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर नेण्याचा पवित्रा घेतला. तणावाच्या वातावरणामुळे रुग्णालयाकडे प्रांताधिकारी रामदास जगताप, तहसीलदार उदयसिंह भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुतराव डफळे, शहर पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळूक, तालुका पोलीस निरीक्षक एस. एम. माने यांनी रुग्णालयाकडे धाव घेवून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. एस. आर. रावखंडे यांची भेट घेतली. परिस्थिती जाणून घेतली आणि संतप्त कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मात्र तणाव वाढतच गेल्याने रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरुप आले.
सौ. कांबळे यांच्या मृत्यूनंतर सकाळी 11 वाजल्यापासून त्यांच्या मृतदेहाचा पंचनामा झाला नाही. त्यामुळे शवविच्छेदनास विलंब झाला. यामुळे तणावात आणखी भर पडली. संतप्त कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी धावपळ करुन पंच आणले आणि पंचनामा केला. यानंतर मृतदेह विच्छेदनास नेण्यात आला. दरम्यान, या कालावधीत सौ. कांबळे यांचा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याचा आरोप दादासाहेब कांबळे, दत्तात्रय जाधव, सतीश कांबळे, रामा कांबळे आदी कार्यकर्त्यांनी केला. प्रांताधिकारी जगताप, तहसीलदार भोसले यांनी या सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. प्रतापसिंहनगरातील पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी खेड ग्रामपंचायतीच्या भारत निर्माण योजनेचा लाभ प्रतापसिंहनगरला मिळावा, सौ. कांबळे यांच्या मृत्यूची चौकशी करुन त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना दिले.
जिल्हाधिकारी देशमुख यांनी प्रतापसिंहनगरला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीला सूचना करण्यात येतील असे सांगितले. तसेच सौ. कांबळे यांच्या मृत्यूची चौकशी करुन त्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत देण्याबाबतही प्रयत्न करण्यात येतील असे देशमुख म्हणाले. यानंतर कार्यकर्ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात आले. यावेळी (दुपारी 2 वाजता) शवविच्छेदन झाले होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळेच सौ. कांबळे यांचा मृत्यू झाला असून ग्रामपंचायत सदस्य येथे आल्याशिवाय मृतदेह न हलवण्याचा सूर उमटू लागला. मात्र काही कार्यकर्त्यांनी मृतदेह ताब्यात घेवून ग्रामपंचायतीसमोर मांडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढली. पोलिसांचे म्हणणे ऐकून कार्यकर्त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रतापसिंहनगर येथे नेला.मृतदेह हलवल्यानंतर संतप्त जमाव मृतदेह खेड ग्रामपंचायतीकडे घेवून जाण्याची शक्यता वाटल्याने ग्रामपंचायतीलगत प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र शांत झालेले कार्यकर्ते मृतदेह घेवून प्रतापसिंहनगरात घेवून गेले. सायंकाळी 5 च्या सुमारास मृतदेह संगममाहुली येथे नेवून अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत सौ. कांबळे यांच्या कुटुंबाला तहसीलदार उदय भोसले, मंडलाधिकारी नंदकुमार गुरव, तलाठी भास्करराव निकम यांनी ताताडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी मदतीचा धनादेश कांबळे कुटुंबियांना प्रदान करण्यात येणार आहे.
सौ. कांबळे यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट?
दरम्यान, सौ. हिराबाई कांबळे यांना गेले तीन वर्ष अस्थम्याचा आजार होता. तसेच रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले त्यावेळी त्यांच्या शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण केवळ 1.8 होते. दूषित पाण्यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होवू लागल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने अशक्तपणा वाढला होता, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी सौ. रत्ना रावखंडे यांनी दिली. सौ. कांबळे यांनी अनेक वेळा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले आहेत. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समजेल असे त्यांनी स्पष्ट केल्याने सौ. कांबळे यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.