कोमलता आणि शुध्दतेचे शिक्षण
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 01:18 AM (IST)
आता अंत:करणाची कोमलता आणि शुध्दता यांचे शिक्षण कसे असते ते पाहा. विद्यार्थी आणि शिक्षण यांच्या कमाईवरच चाललेल्या एका विश्वविद्यालयात "राम' गेला होता. तेथे विद्यार्थी फी वगैरे काही देत नाहीत. सामान्य शिक्षणाखेरीज शिक्षकांच्या देखरेखीखाली विद्यार्थी कॉलेजच्या जमिनीवर व यंत्रांवर काम करतात. प्रोफेसर नवीन नवीन शोध लावतात व लावण्यास शिकवितात. सर्व खर्च शेतकीच्या नवीन तऱ्हा, निरनिराळी पिके आणि नवीन कारागिरी यामुळे जे उत्पन्न येईल त्यातून चालतो. एका खोलीतील काही विद्यार्थ्यांमध्ये "रामा' देखत भांडण लागले. प्रेसिडेंटपर्यंत ही तक्रार गेली. प्रेसिडेंटने त्या खोलीतील सर्व काम बंद करविले आणि बाजाची पेटी सुरू केली. पंधरा मिनिटात भांडण मिटले व आपोआप सलोखा झाला. वाहवा! ज्यांच्या मनामध्ये इतकी शांतीरस भरलेला आहे की, तो जागृत करण्यास बाह्य गायनामुळे लहानसे निमित्त होते बस्स, त्यांची धन्य होय! कशी नाही युक्ती आहे! हवेमध्ये सत्त्वगुण भरून दिला आणि मानवी खळबळ आपोआप शांत झाली.
शिकागो विश्वविद्यालयातील एका अंडरग्रॅज्युएटने "रामा'च्या तत्त्वज्ञानावरील काही व्याख्यानांचे टाचण करून घेतले आणि थोड्याच दिवसात आपल्या पदरचे काही घालून त्याने त्याचे एक नवीन पुस्तक बनविले व ते विश्वविद्यालयात सादर केले. लागलेच त्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात घालण्यात आले. या विद्यार्थ्याने मिल्ल आणि हॅमिल्टन यांची पुस्तके आपल्या डोक्यात कोंबली आहेत की नाहीत, हे काही तेथे पाहण्यात आले नाही. खऱ्या शिक्षणाची कसोटी आपणाला कोणत्या योग्यतेचे ज्ञान आतून बाहेर काढता येते, ही आहे. किती योग्यतेचे ज्ञान डोक्यात कोंबले आहे ही नव्हे. मनुष्य लहान असो, मोठा असो, त्याला बुध्दिमान पशु असे म्हणतात.