उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही : ना. भुजबळ
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:37 AM (IST)
वाई (यशवंतराव चव्हाणनगर), दि. 12 : उर्वरित महाराष्ट्रावर कोणताही अन्याय होवू देणार नाही. उर्वरित महाराष्ट्राला निधी देवून तेथील कामे गतीने होण्यासंदर्भात राज्य पातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे. ती समिती योग्य तो निर्णय घेईल. कोणत्याही परिस्थितीत उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री ना. छगन भुजबळ यांनी केला. दरम्यान, महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. त्यामध्ये इतर ओबीसी, दलित, आदिवासी घटकांचा समावेश झाला पाहिजे, अशी भूमिका आमचीही आहे. यासंदर्भात कार्ला येथे होणाऱ्या शिबिरात निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भाला अनुशेषापोटी नऊ हजार कोटी रुपये दिलेले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत पत्रकारांनी ना. छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष आ. मधुकर पिचड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यासंदर्भात या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.
पिचड म्हणाले, राष्ट्रवादीने यासंदर्भात ठोस भूमिका घेतली आहे. वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ दिल्यानंतर किती बॅकलॉग राहिला, याचीही आकडेवारी काढण्यात येणार आहे. त्यानंतर समिती योग्य तो निर्णय घेईल.
या समितीमध्ये कॉंग्रेसचे नेते ए. के. अँथोनी, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ना. प्रफुल्ल पटेल, ना. छगन भुजबळ आणि आ. पिचड यांचा समावेश आहे.
ना. रामराजे यांच्या मंत्रिपदाबाबत पक्षाला काळजी आहे. दोन महिने थांबा. त्यांच्या मंत्रिपदासंदर्भात योग्य तो निर्णय पक्ष घेईल, असे ना. भुजबळ यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.