Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सत्तेपेक्षाही शिकवण्याचा आनंद लाखमोलाचा : ना. रामराजे
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 10:55 PM (IST)
Tags: regional
कुसुंबी, दि. 13 : मी शिक्षण क्षेत्रात रमणारा माणूस असून शिक्षण क्षेत्रात शिकवण्यात जो पवित्र आनंद मिळतो. तो आनंद लाल दिव्याची गाडी आणि सत्तेपेक्षाही मोठा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
करंडी, ता. मेढा येथील राष्ट्रीय  सेवा योजनेच्या राज्यस्तरीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी केले. यावेळी  आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, जावलीचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अनिल पाटील, डी. जी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. के. झावरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. निर्मलाताई दुधाणे, राज्यभरातून पाच विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रामस्थ उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, जीवनात घड्याळ पाळणे महत्त्वाचे आहे. राजकारणात मऊ राहून चालत नाही पण सामान्य जनतेशी मात्र नेहमी मऊपणे वागतो. डी. जी. कॉलेज, शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळणार आहे. शिबिराच्या माध्यमातून पर्यावरण विषयक कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. पृथ्वीच्या उष्णता वाढीमुळे भविष्यात हिमनद्या वितळूण काय हाहाकार माजेल याची कल्पनाच करणे शक्य नाही. निसर्गचक्र बदलत असून ग्रीन हाऊस इफेक्टमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. यासाठी ग्रीन व्हीलेज, ग्रीन डिस्ट्रीक्ट व ग्रीन स्टेट हा संकल्प राबवला पाहिजे.
 जावली तालुक्यातील शेतीचा आणि पिण्याच्या संदर्भात बोंडारवाडी धरणासंदर्भात सदाभाऊ सपकाळांनी मांडलेले प्रश्न रामराजेंच्या मदतीने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. प्रा. डॉ. एस. के. झावरे यांनी प्रास्ताविक केले.  डॉ. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या शिबिरात पर्यावरण संरक्षण, जल संरक्षण, ग्रामस्वच्छता, मानसिक आरोग्य, महिला सबलीकरण, अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्ती आदी प्रकल्पांवर भर देण्यात आला आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: