|
|
|
जातीयवाद्यांना ताकत देण्याची भाषा करत असाल तर आमच्याकार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम : ना. आर. आर.
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:40 AM (IST)
वाई, दि. 12 ः पाटणमध्ये कॉंग्रेसचे नेते सेनेच्या कार्यकर्त्यांना ताकत देण्याची भाषा करतात. त्यांनी धर्मनिरपेक्षकांना केलेली मदत आम्ही समजू शकतो. विचारांना तिलांजली दिल्यानेच नको त्या प्रवृत्ती फोफावत आहेत. तुम्ही जातीयवाद्यांना ताकत देण्याची भाषा करीत असाल तर आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. छातीची ढाल करून आमच्या कार्यकर्त्यांचे रक्षण करू, असा खरमरीत इशारा गृहमंत्री ना. आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. ते म्हणाले, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा व त्या पैशामधून मोठी सत्ता असे राजकारणाचे होत असलेले सूत्र बदलण्याची गरज आहे. गरीब जनतेसाठी असणाऱ्या अनेक योजना कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोचवल्या पाहिजेत. निवडणुकीपुरते लोक गरीबांकडे जातात ही त्यांची मानसिकता बदलली जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी गरीबांचा मदतनिस म्हणून कार्य करून आपल्या पक्षाचा सेवाभावी कार्यकर्ता असा लौकिक तयार करावा. जनमानसातली प्रतिमा उज्वल करावी. अलीकडच्या काळातील निवडणुकांमध्ये तरूण, विद्यार्थी व महिलांनी केलेले काम पाहता आगामी निवडणुकांमध्ये त्यांना डावलून चालणार नाही. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विविध खेळांचे सामने भरवून तरूणांना एकत्र करून त्यांना संधी देण्याची, एकसंघ करण्याची गरज आहे. भटक्या जाती, मागासवर्गीय, ओबीसी मतदारांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडविल्या तर वेगळी वोट बॅंक तुमच्या पाठीशी उभी राहील. महाराष्ट्राने महिलांसाठी 30 टक्के आरक्षण सर्वप्रथम सुरू केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस महिलांच्या पाठीशी सदोदित एकत्रित येण्याची गरज आहे. जे पक्ष त्यातून माघार घेतील, त्यांच्याशी लढण्याची तयारी राष्ट्रवादी पक्षाची राहील, असे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय देण्याची गरज नाही. शेतीमालास मधल्या दलांलांमुळे योग्य भाव मिळत नाही. या दलालांच्या बाबतीत योग्य तो निर्णय लवकरच घ्यावा लागेल. राज्याच्या उत्पन्नाच्या 15 टक्के उत्पन्न शेतकऱ्यांकडून मिळते. राज्यात शेती करणारे लोक 60 टक्के आहेत. उर्वरित सेवा व उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या 40 टक्के लोकांकडून 85 टक्के उत्पन्न मिळते याची कारणे शोधली पाहिजेत. गरीब व श्रीमंतांमधील वाढत असलेली दरी अधिकच रूंदावत आहे. हे असेच राहिले तर खेडी ओस पडतील. हा परिणाम मुक्त अर्थव्यवस्थेचा आहे का हे ही पाहिले पाहिजे. समाजात गुन्हेगारी वाढण्यामागे गरिबी, तरुणांची वाढती बेकारी, बदलती सामाजिक स्थिती, उपेक्षित राहिलेला समाज ही कारणे असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरामध्ये दरोडा व चोऱ्यांच्या तुलनेत व्हाईट कॉलरने लुबाडलेल्या पैशाची किंमत 10 पट जास्त आहे. पतसंस्थांमध्ये चेअरमन व संचालक एकत्र येऊन सामान्यांचे पैसे लुबाडत आहेत. यासाठी सावकारांच्याबाबतीत घेतलेला निर्णय पतसंस्थांबाबतही घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. धर्माधर्मात, जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम काही पक्ष करीत आहेत. कार्यकर्त्यांनी आपण कोणत्या पक्षाचे आहोत हे ठाम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
फोटो गॅलरी
|