सेवाधर्म
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 01:20 AM (IST)
एकदा काही बंगाली, पंजाबी लेखक स्वामी विवेकानंदांकडे त्यांचा उपदेश श्रवण करण्यासाठी आले. त्या वेळी पंजाबमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. स्वामीजींनी पंजाबी माणसाकडून दुष्काळासंबंधी सर्व माहिती करून घेतली. त्यानंतर दुष्काळ निवारण करण्यासाठी काय करता येईल, समाजसेवकांना तेथे जाऊन कसे कार्य येईल यासंबंधी तासभर चर्चा केली उपदेश ऐकण्यासाठी आलेल्या लोकांची वेळ जशी संपत आली तशी काही लोकांची अस्वस्थता वाढत गेली. शेवटी एक बंगाली लेखक म्हणाला, "आम्ही आपणांकडून धर्म, तत्वज्ञान, मोक्ष इत्यादीसंबंधी ऐकायला आलो होतो. आपण सारा वेळ पंजाबच्या दुष्काळावर चर्चा करण्यातच खर्च केला. आपण आमची खूप निराशा केली. स्वामी विवेकानंदांनी त्यावर त्या शिष्टमंडळाला उत्तर दिले, मनुष्याची सेवा यापेक्षा दुसरा कोणताही श्रेष्ठ धर्म नाही. मानवसेवा भुकेलेल्याला अन्न न देता, त्याची काळजी न करता ईश्वराची पूजा करणे हा मी ईश्वराचा सन्मान न समजता अपमान समजतो. तसे करणे हे पाखंड होईल. सेवाकर्म हाच धर्म व संस्कृती आहे. धर्माची पहिली पायरी म्हणजे सत्कर्म. उपदेश ज्ञान वगैरे गोष्टी त्यातून आपोआप मिळतात.
तात्पर्य : सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे.