सचिन बनला संयुक्त राष्ट्रांचा राजदूत
pti news
Saturday, March 13, 2010 AT 02:46 AM (IST)
नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : भारताचा स्टार क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यावरण कार्य-क्रमाचा सदिच्छा राजदूत (गुडविल ऍम्बॅसेडर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यासाठी युनायटेड नेशन्स एन्हायर्नमेंट प्रोग्रॅम(यूएनईपी) तयार करण्यात आला आहे. यूएनईपीचा राजदूत म्हणून सचिन आता जगभरात पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार आहे.
वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा प्रथम पूर्ण करणारा आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम द्विशतक झळकवणारा सचिन त्याची जागतिक लोकप्रियता वापरुन भारतात आणि जगात पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करणार असून पर्यावरण वाचवण्याच्या प्रयत्नात आपले योगदान देणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात सचिनच्या नियुक्तीची व यूएनईपीची घोषणा करण्यात आली.
या नियुक्तीनंतर सचिन म्हणाला, मी जगभरात क्रिकेट खेळलो असून त्याचा आनंद लुटला आहे. आता आपले एकमेव घर असलेली वसुंधरा वाचवण्यासाठी काही तरी करावे, अशी माझी इच्छा आहे.
आपली पृथ्वी संहारापासून वाचवण्याच्या या प्रयत्नात झोकून देणे हे मोठे आव्हान आहे. मात्र मी हे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज आहे. यूएनईपी आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांसोबत मी काम करणार आहे. आपण संघटितरित्या पृथ्वीचा विनाश वाचवण्याचे काम करू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
2010 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले असून जगभरात प्राणी व वनस्पतींच्या जैवविविधतेचे होणारे नुकसान रोखण्याच्या यूएनईपीच्या प्रयत्नांना आता सचिनच्या लोकप्रियतेची जोड लाभणार आहे. संयुक्त राष्ट्रांसोबत काम करण्याची सचिनची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्याने युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडाच्या (युनिसेफ) वैयक्तिक आरोग्यविषयक मोहिमेत आपले योगदान दिले होते.