आयपीएलचा उद्घाटन सोहळा धमाकेदार
pti news
Saturday, March 13, 2010 AT 02:47 AM (IST)
मुंबई, दि. 12 (वृत्तसंस्था) : एक वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मायभूमीत परतलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या आवृत्तीचा उद्घाटन सोहळा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर धमाकेदार कार्यक्रमाने शुक्रवारी रात्री अभूतपूर्व उत्साहात झाला. थक्क करणारा लाईट अँड साऊंड शो, आंतरराष्ट्रीय बॅंडचे बेधुंद करणारे संगीत व बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोनसह 40 कलाकारांची थिरकलेली पावले हे या रंगारंग सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
या कार्यक्रमात पाश्चात्य देशात अत्यंत लोकप्रिय ठरलेला अली कॅम्पबेलचा यूबी 40 बॅंड, ब्योर्न ऍगन, लिओनेल रिची यांच्या दणकेबाज संगीताने डी. वाय. पाटील स्टेडियम थरारले. दीपिका पदुकोन व 40 नृत्य कलाकारांनी लोकप्रिय गाण्यांवर भन्नाट नृत्याविष्कार सादर करुन प्रेक्षकांची मने रिझवली.
या कार्यक्रमापूर्वी सहभागी आठ संघांचे कर्णधार सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी, शेन वॉर्न, ऍडम गिलख्रिस्ट व कुमार संगकारा यांनी प्रतिस्पर्धी संघ आणि पंचांचा सन्मान राखू, असा आशय असलेली शपथ घेतली. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचे भाषण झाले.
आठही कर्णधारांनी युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम अंतर्गत पुनर्प्रक्रिया केलेल्या साहित्यापासून तयार केलेल्या पृथ्वीच्या गोलावर स्वाक्षऱ्या केल्या. कार्बन फुटप्रिंटबाबत असलेली आपली वचनबध्दता त्यांनी अधोरेखित केली. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरील ऍक्शन दाखवणाऱ्या लेसर शोने प्रेक्षकांना थक्क केले. ए. आर. रेहमानच्या "जय हो' या सुपरहिट गाण्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या लेसर शोला प्रेक्षकांनी आरोळ्यांनी दाद दिली. अर्थात हे स्टेडियम अपेक्षेनुसार प्रेक्षकांनी खचाखच भरलेले नव्हते.
हिट गाण्यांवर दीपिका व 40 कलाकार नृत्याविष्कार करत असताना कलाकारांनी एलईडीच्या स्टिक्सद्वारे आठही फ्रॅंचायझींचे लोगो तयार केले. कॅम्पबेलच्या "कान्ट हेल्प फॉलिंग इन लव्ह' या जगप्रसिध्द गाण्यावर रंगीबेरंगी कपडे परिधान केलेल्या कलाकारांनी नृत्य सादर केले. या गाण्याने प्रारंभ झालेल्या उद्घाटन सोहळ्याची सांगता रिचीच्या "डान्सिंग ऑन द सीलिंग' या गाण्याने झाले. त्यानंतर फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली.