Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सत्तेसाठी स्व. चव्हाण यांच्या नावाचे राजकारण्यांकडून बाजारीकरण : डॉ. पाटील
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:36 AM (IST)
Tags: regional
कराड, दि. 12 : इंग्रजीचे चार शब्द नीट वाचता येत नसलेल्या महाकवींनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यावर अनेक दर्जाहीन पुस्तके लिहिली असल्याचे सांगत महाराष्ट्रातील प्रत्येक नेता मतांसाठी स्व. चव्हाण साहेबांच्या नावाचा उपयोग करीत आहे. पण त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांपैकी एकही गुण सध्याच्या  राजकारण्यांमध्ये नसून सत्तेसाठी राजकारण्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे बाजारीकरण केले असल्याचे परखड मत  ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र कराड आणि दैनिक प्रीतिसंगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान्यात ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे संचालक अशोकराव चव्हाण, विभागीय केंद्राचे सचिव मोहनराव डकरे, माजी खा. श्रीनिवास पाटील, दै. प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पाटील म्हणाले, आज अनेक लेखक तयार झाले असले तरीही एकालाही इंग्रजीचे चार शब्द नीट वाचता येत नाहीत आणि ते स्वत:चा महाकवी असा उल्लेख करतात. त्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण  यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. परंतु त्या पुस्तकांचा दर्जा नसून त्या पुस्तकांना रद्दीच म्हणण्याची वेळ आली आहे. यशवंतराव चव्हाण आणि विश्वसाहित्य हे पुस्तक आपण लवकरच प्रकाशित करणार आहे.
स्व. चव्हाण मराठी सारखे इंग्रजी बोलत होते. पण आज राज्यातील नेते काहीही बोलत नाहीत. राज्यात असा एखादा नेता आहे का, की ज्यांची संस्था नाही? असा प्रश्न उपस्थित करीत डॉ. पाटील म्हणाले, की सरपंच झाला की लगेचच दोन-तीन दिवसात स्वत:ची अशी संस्था हे राजकारणी लोक निर्माण करुन सत्तेच्या जोरावर तिचा नावलौकिक पसरवतात. आज स्व. चव्हाण साहेबांच्या नावाचा सर्व नेते उल्लेख करत असतात. कारण त्यांना आपला स्वार्थ साधायचा असतो. अशा या राजकारण्यांच्या वृत्तीमुळे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे बाजारीकरण झाले असून सत्तेसाठी राजकीय नेते हे सर्व करत आहेत.
स्व. यशवंतराव चव्हाण हे कॉंग्रेसचेच नव्हते तर ते कम्युनिस्टही होते. पण त्यापेक्षा ते अगोदर सर्वसामान्य जनतेचे होते. भाषेच्या माध्यमातून नैतिक वजन निर्माण करणारे स्व. चव्हाणसाहेब हे एकमेव नेते आहेत. भारत हा महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पण त्यासाठी यशवंत नीतीची गरज असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
श्रीनिवास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मोहनराव डकरे यांनी प्रास्ताविक केले. कराळे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल पाटील यांनी आभार मानले. यावेळी विविध पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: