|
|
|
मतदारांचा पाठिंबा असलेल्या कार्यकर्त्यांना सत्तास्थाने मिळावीत : ना. जयंत पाटील
ऐक्य समूह
Saturday, March 13, 2010 AT 02:39 AM (IST)
वाई (यशवंतराव चव्हाणनगर), दि. 12 : राज्यामध्येकेवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच सत्ता आणायची असेल, तर महामंडळे आणि इतर सत्तास्थानांवर ज्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करताना त्यांना परिसरातील मतदारांचा पाठिंबा आहे की नाही, याची कसून तपासणी होणे आवश्यक आहे. केवळ कोणी नेता कोणाही कार्यकर्त्याचे नाव सुचवितो म्हणून त्याला पद बहाल करणे किंवा त्याची वर्णी लावणे हे पक्षाच्या हिताचे नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिला. आपले हे मत उपस्थितांना आणि काही ठराविक नेत्यांना आवडणारे नाही याची आपल्याला जाणीव असल्याचेही ना. पाटील यांनी स्पष्ट केले. वाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे स्व. यशवंतराव चव्हाण नगरात एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांताध्यक्ष आ. मधुकर पिचड होते. यावेळी गृहमंत्री ना. आर. आर. पाटील, ग्रामीण विकास मंत्री ना. जयंत पाटील, ऊर्जा मंत्री ना. अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलाध्यक्षा श्रीमती निवेदिता माने, माजी ग्रामीण विकास मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे चेअरमन सुधाकर परिचारक, नियोजन मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, माजी खा. लक्ष्मणराव पाटील, श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व शिबिराचे महासमन्वयक वसंत वाणी, कृष्णकांत कुदळे, वसंत माने, रवींद्र माळवदकर यांची प्रमुख उपस्थित होती. ना. पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या विधायक कामांचा अहवाल सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. प्रादेशिक अनुशेषाच्या बाबतीत असंतोष राहणार नाही असे निर्णय घेऊन देखील आपणास टिकेला सामोरे जावे लागत असल्याच्या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधून ते म्हणाले, आता आर्थिक समतोल निर्माण करण्यासाठी लोकसंख्या, जिल्हा व तालुका या घटकांचा विचार करावाच लागेल. मागासलेल्या प्रदेशांचा बराचसा अनुशेष भरुन काढण्यात आलेला आहे. अनुशेषाचे मोजमाप जिल्ह्यावर न करता तालुकास्तरावर करण्यात यावे. विदर्भासह सर्वच भागात समतोल विकासाचा विचार आता रुजविण्याची गरज आहे. औद्योगिकदृष्ट्या विकासाचा समतोल राखताना सांगली, सोलापूर या जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पालकमंत्री ना. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात पिण्याच्या व शेती पाण्याच्या प्रश्नाने निर्माण झालेली गंभीर समस्या भवितव्याच्या दृष्टीने सोडविण्याची गरज आहे. विदर्भाचा अनुशेष आता शिल्लक नाही. अनुशेषाचे निकष आता बदलण्याची गरज आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची धोरणे स्पष्ट व लोकाभिमुख असताना देखील देशातील विविध प्रश्नांवर सातत्याने टीका होत आहे आणि पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या बाबतीत शांत आहेत, ही परिस्थिती योग्य नाही असे सांगून माजी खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, धरणांची आणि कालव्यांची अनेक कामे अपूर्ण आहेत. जिथे धरणे झाली तेथील जनतेचे पुनर्वसन झाले नाही. दर्जेदार शिक्षणापासून पश्चिम महाराष्ट्र वंचित आहे. आज आपल्या पक्षात काम न करता तिकीट, काम न करणारांना पाकीट ही निर्माण झालेली परिस्थिती जाणीवपूर्वक बदलली पाहिजे. सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपली सत्ता कायम ठेवणेे आवश्यक असल्याचे सांगितले.. आपल्या मतदारसंघात शिबिर घेतल्याबद्दल आ. मकरंद पाटील यांनी सर्वांना धन्यवाद दिले. शरद पवारांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर मी वाई, महाबळेश्वर, खंडाळा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवली व विजयी झालो. विजयानंतर कोणाच्याही फोनची वाट न पाहता शरद पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केल्याचे सांगितले. वसंत वाणी यांनी शिबिराचा हेतू सांगितला. नव्यानेच बिनविरोध निवडून आलेल्या पुणे येथील सौ. वंदना चव्हाण यांचा यावेळी श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. चव्हाण यांनी जागतिक पर्यावरणासंबंधात उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रारंभी सर्व मंत्री महोदयांना राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी मानवंदना दिली. पालकमंत्री ना. रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खा. लक्ष्मणराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, प्रसाद सुर्वे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी शिबिरास आ. लक्ष्मणराव जगताप, आ. के. पी. पाटील, आ. अशोक पवार, आ. रमेश थोरात, आ. दिलीप मोहिते, आ. विलास लांडे, आ. दीपक साळुंखे, आ. बबनदादा शिंदे, राज्याचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार नरसिंग मेंगजी, जिल्हा परिषदेचे गट नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती ऍड. भास्करराव गुंडगे तसेच पाच जिल्ह्यातून सुमारे 10 हजार कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये महिलांची उपस्थिती समाधानकारक होती. शिबिरामध्ये सुमारे दोन तास पाचही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आपली मनोगते व्यक्त करण्यास संधी दिली. त्यामध्ये सांगलीच्या माजी महापौर सौ. अमृताताई पाटील, आर. के. पोवार, सुनील ढिगळे, अजित बर्गे, वसंतराव चव्हाण, कोल्हापूरचे जाधव गुरूजी, बी. के. गोगले, डॉ. वर्षा शिवळे, राम पाटील, बाबासाहेब पाटील, शकुंतला साठे, शंकरराव चाळेकर, दत्ता घाडगे आदींचा समावेश आहे. गरीबांनाही पदे जिची चहा देण्याचीसुध्दा ऐपत नाही, त्या माझ्या- सारख्या गरीब महिलेला ना. अजित पवार यांनी पाच पदे दिली. शरद पवार व अजित पवार हे माझे देव आहेत, असे उद्गार पुणे येथील शकुंतला साठे यांनी काढले. आ. मकरंद पाटील यांचा मंत्र्यांकडून गौरव... आ. मकरंद पाटील यांच्या कुशल संयोजनाचा ना. छगन भुजबळ, ना. आर. आर. पाटील, ना. अजित पवार, ना. हसन मुश्रीफ, माजी खा. निवेदिता माने यांनी गौरव केला. हे नेतृत्व राज्यपातळीवर चमकावे, असे वसंत वाणी म्हणाले.
फोटो गॅलरी
|