चुरशीच्या लढतीत हॉलंडला नमवून ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत
pti news
Friday, March 12, 2010 AT 01:15 AM (IST)
नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : वेगवान हॉकी खेळणाऱ्या दोन संघांची थरारक लढत मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना पहायला मिळाली. या विश्वचषक स्पर्धेतील हॉलंडची वाटचाल रोखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. अतिशय चुरशीच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने 2-1 असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली.
वेगवान हॉकी खेळणाऱ्या हॉलंडने ऑस्ट्रेलियाला तगडे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियानेही तोडीस तोड वेगवान खेळ करुन हे आव्हान पेलले. पहिल्या 15 मिनिटात ऑस्ट्रेलियाने हॉलंडवर दबाव टाकला. 22 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला फ्री हिट मिळाली होती. मात्र डच बचावपटूंनी उत्कृष्ट बचाव केला. ऑस्ट्रेलियाला 29 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर ल्यूक डोर्नरने ऑस्ट्रेलियाला आघाडीवर नेले. उत्तरार्धात 55 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन टर्नरने गोलजाळ्याच्या बरोबर समोरुन दुसरा गोल नोंदवला. ही आघाडी हॉलंडच्या ताईके ताकेमाने पेनल्टी स्ट्रोकवर कमी केली.