Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प्रतापसिंहनगरमध्ये गॅस्ट्रोसदृश साथ : 17 बाधित
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 12:52 AM (IST)
Tags: local news
सातारा, दि. 11 : गटारातील साचलेले पाणी सार्वजनिक पाणीपुरवठा पाईपलाईन-मध्ये गेल्याने प्रतापसिंहनगर येथील सुमारे 17 ग्रामस्थांना गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाली. दूषित पाण्यामुळेच साथ फैलावत असल्याचा अंदाज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत युध्दपातळीवर प्रतिबंधात्मक उपचार सुरु केले आहेत. चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने या रुग्णांवर तातडीने उपचार केले. उपचारानंतर सर्व रुग्णांना घरी सोडून देण्यात आले.
दरम्यान, काही वृत्तवाहिन्यांनी या साथीची लागण 100 पेक्षा जास्त रुग्णांना झाल्याचे वृत्त प्रसारित केल्याने या परिसरात खळबळ माजली होती. मात्र ही साथ गॅस्ट्रोची नाही. रुग्णांना फक्त जुलाब झाल्याचा निर्वाळा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. या साथीमुळे खेड ग्रामपंचायत सदस्यांची तातडीची बैठक बोलावण्यात येणार आहे.
प्रतापसिंहनगर येथे मंगळवारी रात्री अचानक सुमारे 10 ते 12 ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली तर काही ग्रामस्थांच्या पोटात दुखू लागल्याने परिसरात खळबळ उडाली. ग्राम-पंचायतीचे सदस्य रामभाऊ लंकेश्वर यांनी तातडीने सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली असता सरपंच सौ. शोभा पवार, ग्रामविकास अधिकारी जी. बी. माने, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी के. एम. सकपाळ, आरोग्य सेवक बी. व्ही. कुलकर्णी, श्रीमती एच. व्ही. मालुसरे, औषध निर्माता एम. ए. कुलकर्णी, सुनील कदम यांचे पथक डेरेदाखल झाले. वैद्यकीय पथकाने रुग्णांवर तातडीने उपचार सुरु करुन औषधांचे वाटप केले. तसेच खेड ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणा बंद करुन ग्रामस्थांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरु केला. युध्दपातळीवर उपाययोजना सुरु झाल्याने साथ नियंत्रणात आली. मात्र गुरुवारी रुग्णांमध्ये थोडी वाढ झाली. 17 रुग्णांना जुलाब, अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
सकाळपासून वैद्यकीय पथकाने ग्रामस्थांच्याघरोघरी जावून उपचार सुरु केले तसेच मेडिक्लेमचे वाटप केले. पाणी आणि शौच नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. येथील प्राथमिक शाळेच्या आवारात 24 तास आंतर रुग्ण कक्ष सुरु करण्यात आला असून दोन रुग्णांना सलाईन लावण्यात आले आहे. गुरुवारी   सुशिला हटवळ (वय 40), लीलाबाई पवार (वय 40), पूनम विणकर (वय 10), सरस्वती डोकेफोडी (वय 30), शैला गव्हाळे (वय 23), बायडाबाई ओव्हाळ (वय 39), बसवा कांबळे (वय 65), बोबडे (वय 58, पूर्ण नाव माहीत नाही.) या रुग्णांना अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना सलाईन लावण्यात आले. सुषमा मस्के (वय  20) या महिलेला अधिक  उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. वैद्यकीय उपचार वेळीच सुरु झाल्याने साथ आटोक्यात आली असून कोणत्याही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रतापसिंहनगरला खेड ग्रामपंचायतीमार्फत गार्डे यांच्या विहिरीवरुन पाणीपुरवठा केला जातो. विहिरीतील पाणी येथील साठवण टाकीत जमा होते व तेथून सार्वजनिक पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही नागरिकांनी यादव यांच्या विहिरीवरुनदेखील खाजगी नळकनेक्शन घेतले आहे. पाणीपुरवठ्याच्या पाईपला ठिकठिकाणी गळती आहे. येथील जिल्हा परिषद शाळेनजिक ठिकठिकाणी पाणी साचले आहे. दोन-तीन ठिकाणी पाईपलाईनला गळती असून दलदल झाली आहे. या परिसरात सार्वजनिक पाईपलाईन गटारानजिक जोडल्या आहेत. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांनी ठिकठिकाणी खड्डे खोदले असून ग्रामस्थ या खड्ड्यांमधून अनेक वर्षे पाणी उपसत आहेत. गटारातील व खड्ड्यात साचलेले दूषित पाणी ग्रामस्थांच्या पिण्यात आल्याने ही लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. खेड ग्रामपंचायतीने सध्या गळती काढण्याची मोहीम हाती घेतली असून खड्डे बुजविण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावली आहे. ग्रामस्थांनी खड्ड्यातील खाजगी नळ कनेक्शन तातडीने बंद करावीत, पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन सरपंच सौ. शोभा पवार, ग्रामविकास अधिकारी जी. बी. माने, वैद्यकीय अधिकारी के. एम. सपकाळ यांनी केले आहे.
दरम्यान, प्रतापसिंहनगरला शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पाईप लाईनला गळती असल्याची सूचना देऊनही ग्रामपंचायत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप दादासाहेब ओव्हाळ व राम लंकेश्वर यांनी केला. आरोग्य विभागाने खेड ग्रामपंचायतीला प्रतापसिंहनगर येथील पाणी पुरवठ्याच्या दक्षतेबाबत 12 वर्षापूर्वीच रेडकार्ड दिले आहे. दूषित पाण्यामुळे फैलावणाऱ्या आजारावर ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जनजागृती करुन कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: