Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड तालुक्यात 11 हजार संशयित बोगस शिधापत्रिका
ऐक्य समूह
Friday, March 12, 2010 AT 01:01 AM (IST)
Tags: regional

कराड, दि. 11 : राज्य शासनाच्या सूचनेनुसार कराड तालुक्यात महसूल विभागाने राबवलेल्या बोगस शिधापत्रिका शोधमोहिमेत सुमारे 11 हजार संशयित शिधापत्रिका सापडल्या आहेत. संबंधितांना योग्य पुरावे सादर करण्याच्या नोटीसा तहसीलदार सुनील जोशी यांनी दिल्या आहेत. पुरावे सादर न करणाऱ्यांच्या शिधापत्रिका रद्द होणार आहेत.
बोगस शिधापत्रिका, ज्येष्ठ नागरिक पास आणि विविध दाखले बनवणाऱ्यांबद्दल राज्य शासनाकडे अनेकदा तक्रारी झाल्या होत्या. राज्यात अनेक ठिकाणी बोगस शिधापत्रिका बनवणाऱ्यांना पोलिसांनी पकडले होते. कराड तालुक्यातही अशी कारवाई झाली होती. कराड तालुक्यात तहसीलदार सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बोगस रेशनकार्ड शोधमोहीम राबवली. या मोहिमेत शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्याकडील शिधापत्रिकेची सत्यप्रत, दोन छायाचित्रे आणि रहिवासाचा पुरावा फॉर्मसोबत सादर करण्यास सांगितले होते.
तालुक्यात जवळपास 1 लाख 30 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी सुमारे 1 लाख 20 हजार लोकांनी फॉर्म भरुन शिधा पुरवठा विभागास सादर केले होते तर सुमारे 10 हजार लोकांनी फॉर्मच सादर केले नाही.
पुरवठा विभागाकडे आलेल्या फॉर्म्सची पात्र आणि संशयित अपात्र अशी वर्गवारी केली आहे. पुरवठा विभागाकडे आलेल्या फॉर्मनुसार सुमारे 90 हजार शिधापत्रिका योग्य पुराव्यामुळे पात्र ठरल्या असून 11 हजार शिधापत्रिका रहिवासाच्या पुराव्याअभावी संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
संशयित बोगस शिधापत्रिकाधारकांना तहसीलदारांनी नुकत्याच नोटीसा दिल्या आहेत. योग्य पुरावे सादर न केल्यास या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत फॉर्म न देणाऱ्यांवर योग्य कार्यवाही करुन बोगस शिधापत्रिकाधारकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: