|
|
|
एस. टी. ची भाडेवाढ प्रत्येक टप्प्यावर 29 पैसे जादा मोजावे लागणार
PTI ---
Friday, March 12, 2010 AT 12:26 AM (IST)
मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : एस.टी. प्रवास आता महागणार असून महागाईने आधीच होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला एस. टी. च्या तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एस. टी. ने प्रत्येक टप्प्यावर 29 पैसे इतकी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दरवाढीचा फटका लांब पल्ल्यांच्या प्रवाशांना बसणार आहे. केंद्रिय अर्थसंकल्पात डिझेलचे दर लिटरमागे 2 रुपये 85 पैशांनी वाढले आहेत. एसटीला रोज सुमारे 10 लाख लिटर डिझेल लागते. डिझेल दरवाढीमुळे दरवर्षी 140 कोटींचा बोजा एसटीवर पडणार आहे. डिझेलचे दर वाढल्यानंतर एसटीची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्यपातळीवरील सचिव समितीला असतात. या समितीच्या बैठकीत प्रत्येक टप्प्यावर 29 पैसे इतकी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, खाजगी गाड्यांच्या बरोबरीने एसटीला 10 टक्के प्रवासी कर लावल्यास महामंडळाचे किमान 200 कोटी रुपये वाचतील तसेच एसटीचा टोल रद्द करावा जेणे करून त्यांचे 60 कोटी रुपये वाचतील, पर्यायाने एसटीचे 260 कोटी रुपये वाचणार आहेत. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी एसटी कामगार युनियनने केली आहे.
फोटो गॅलरी
|