आयपीएल बोनॅन्झाला आजपासून दणक्यात प्रारंभ
PTI ---
Friday, March 12, 2010 AT 01:05 AM (IST)
मुंबई, दि. 11 (वृत्तसंस्था) : क्रिकेटच्या वेडाने झपाटलेल्या भारतीय क्रीडाप्रेमींवर आणखी गारुड करण्यासाठी पुन्हा भारतात अवतरलेल्या आयपीएलचा उद्या नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर दणक्यात प्रारंभ होणार आहे. उद्घाटन समारंभानंतर गतविजेत्या डेक्कन चार्जर्सची सलामी कोलकाता नाईट रायडर्सशी झडणार आहे.
गेल्या वर्षी देशातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यास केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे आयपीएलच्या दुसऱ्या आवृत्तीचे स्थलांतर दक्षिण आफ्रिकेत झाले होते. परदेशात होऊनही या आवृत्तीमध्येही भारतीय क्रिकेटप्रेमींनी अभूतपूर्व उत्साह दाखवला होता. आता आयपीएलचे पुन्हा भारतात आगमन झाले असून ही लीग भारतीयांना आपल्या कवेत घेण्यासाठी सरसावली आहे.
डी. वाय. पाटील स्टेडियमवर उद्या होणाऱ्या उद्घाटन समारंभात लिओनेल रिची, यूबी 40 आणि ब्योन ऍगन या पाश्चात्य पॉपसिंगर व बॅंडसमवेत बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची पावले थिरकणार आहेत. त्यानंतर फटाक्यांची भव्य आतषबाजी आणि अतिभव्य लेसर शो होणार आहे. रंगारंग कार्यक्रम संपल्यानंतर आयपीएलच्या उद्घाटनाची अधिकृत घोषणा होणार आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर मैदानात होणारा कचरा तातडीने बाजूला करुन शुभारंभाचा सामना होणार आहे.
तब्बल 45 दिवस होणाऱ्या या लीगमधील सलामीचा सामना ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखालील गतविजेता डेक्कन चार्जर्स व गतवर्षी जवळपास तळाच्या स्थानी असलेल्या, पण आता कात टाकल्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.
दुसऱ्या दिवशी क्रिकेटमधील दोन लीजंडस् एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्स संघाची आयपीएलची शुभारंभाची स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन फिरकी जादुगार शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल्सविरुध्द कसोटी लागणार आहे. पहिल्या दोन आवृत्तीत असमाधानकारक कामगिरी करणारा मुंबई इंडियन्स संघ मागील अपयश धुवून काढण्यासाठी यावेळी उतरेल.
आयपीएलच्या पहिल्या दोन हंगामांप्रमाणेच यावेळी काही फ्रॅंचायझी संघांना सुरुवातीच्या टप्प्यात काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या सेवेला मुकावे लागणार आहे. ज्या संघांवर ही आफत ओढवणार आहे ते संघ उर्वरित खेळाडूंची अचूक निवड करुन स्पर्धेतील आपली गती कायम ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील.
आयपीएल-3 ही खेळाडूंना आयपीएल-4 मधील लिलावात संधी मिळण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या आयपीएलमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बहुधा घरचा रस्ता दाखवला जाईल. त्याचवेळी पहिल्या तिन्ही लीगमध्ये स्थान मिळवू न शकलेल्या खेळाडूंनाही आयपीएल-4 मध्ये संधी मिळणार आहे. कारण पुढील वर्षी आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची भर पडेल. यावेळची कामगिरी पुढच्या लिलावावेळी आपल्या किंमतीत भर घालू शकेल, याची जाणीव क्रिकेटपटूंना आहे. ती संधी साधण्यासाठी ते जीवाचे रान करतील. त्यामुळे यावेळी क्रिकेटरसिकांना दणकेबाज कामगिरीचा थरार अनुभवता येईल.
यावेळी आयपीएल सामन्यांच्या ठिकाणात अहमदाबाद, कटक व धर्मशाला या तीन शहरांची भर पडली आहे. त्यामुळे या शहरांमधील क्रिकेट चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानातील कामगिरी पहायला मिळेल आणि त्यातून आयपीएलचा विस्तार आणखी वाढत जाईल. यावेळी स्ट्रॅटजिक ब्रेक्सची संख्या वाढवून त्यांचा कालावधी अडीच मिनिटांचा करण्यात आला आहे. क्षेत्ररक्षण व फलंदाजी करणाऱ्या संघांनी हे ब्रेक्स विशिष्ट षटकांनंतर घेतले पाहिजेत, असे बंधन घालण्यात आले आहे. या ब्रेक्समुळे खेळाडूंना छोटीशी विश्रांती तर मिळेलच शिवाय संघांना आपापल्या डावपेचांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची संधी मिळेल.