इंग्लंडचा धुव्वा उडवून जर्मनी अंतिम फेरीत
PTI ---
Friday, March 12, 2010 AT 01:07 AM (IST)
नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : विश्वचषक स्पर्धेच्या "अ' गटात बलाढ्य ऑस्ट्रेलियासह भारत, पाक, दक्षिण आफ्रिका यांना नमवून दिमाखात उपांत्यफेरी गाठणाऱ्या इंग्लंडचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न युरोपातील पॉवरहाऊस जर्मनीने उद्ध्वस्त केले. जर्मनीने इंग्लंडचा 4-1 असा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत जर्मनीची गाठ युरोपातील आणखी एक पॉवरहाऊस हॉलंडला नमवणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी पडेल.
विश्वविजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या मार्गावर असलेल्या जर्मनीने मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर इंग्लंडला नेस्तनाबूत केले. मध्यंतरालाच जर्मनीने 3-1 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात आणखी एक गोल नोंदवून त्यांनी इंग्लंडला पाणी पाजले.
या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या जर्मनीकडून जीन मार्को मोंटॅग (6 वे), ऑलिव्हर कॉन (11 वे), मार्टिन हॅनर (31 वे) व लिनस बट्ट (60 वे मिनिट) यांनी गोल नोंदवले. इंग्लंडचा एकमेव गोल रिचर्ड स्मिथने 19 व्या मिनिटाला नोंदवला.
पूर्वार्धात जर्मनीने पूर्ण वर्चस्व गाजवले. अनुभवी मथायस विटहॉसने अनेक धोकादायक चाली रचून इंग्लंडच्या गोलक्षेत्रात वारंवार धडक मारली. या बहारदार खेळामुळे जर्मनीला सुरुवातीलाच दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. विश्वचषक स्पर्धेत केवळ दुसऱ्या उपांत्य सामन्यात खेळणाऱ्या इंग्लंडला पूर्वार्धात फक्त एक पेनल्टी कॉर्नर मिळवता आला. पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर मोंटॅगच्या जोरदार ड्रॅग फ्लिकने जर्मनीला आघाडीवर नेले. इंग्लंडचा गोलरक्षक जेम्स फेअरच्या स्टिकला लागून चेंडू गोलजाळ्यात गेला. पाच मिनिटांनीच जर्मनीने थरारक गोल नोंदवला. ऑलिव्हर कॉनने इंग्लंडच्या गोलवर्तुळाच्या कडेवर मिळालेल्या पासवर अप्रतिम गोल केला.
इंग्लंडने 19 व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला. त्यावर रिचर्ड स्मिथने ड्रॅग फ्लिक घेतली. जर्मनीच्या मोंटॅगच्या स्टिकला लागून परत आलेल्या चेंडूवर स्मिथने गोलरक्षक टीम जेसुलॅटला चकवले. या गोलने जर्मनीची आघाडी कमी केली. इंग्लंडचा गोल झळकल्यानंतर तीनच मिनिटांनी जर्मनीने गोल केला असता, पण मोंटॅगच्या फटक्यावर फेअरने अप्रतिम बचाव केला. मात्र 31 व्या मिनिटाला मार्टिन हॅनरला मात्र तो गोल करण्यापासून रोखू शकला नाही. यावेळी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हॅनरने उंचावरुन मारलेला फटका फेअरला चकवून गोलजाळ्यात विसावला.
उत्तरार्धात इंग्लंडने जोरदार प्रतिहल्ला चढवला, पण त्यांना एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही. त्याउलट जर्मनीला मिळालेल्या एकमेव पेनल्टी कॉर्नरवर लिनस बट्टने रिबाऊंडवर गोल केला.