Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सर्वपक्षीय चर्चेची दारे खुली..!
PTI ---
Friday, March 12, 2010 AT 12:28 AM (IST)
Tags: main news

नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : राज्यसभेत प्रचंड मताधिक्याने मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडण्यापूर्वी त्यावर सर्व पक्षांची मते जाणून घेतली जातील, अशी ग्वाही केंद्र सरकारने दिल्यामुळे महिला आरक्षण विधेयकासंदर्भातील तणाव निवळू शकेल असे चित्र आहे.
समाजवादी पार्टी, राजद नेत्यांच्या भेटीनंतर वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सर्वपक्षीय चर्चेची तयारी दाखविली आहे. महिलादिनापासून संसदेत गाजणाऱ्या महिला आरक्षण विधेयकावरून आज गुरुवारीही लोकसभेत खडाजंगी झाली. या विधेयकात अल्पसंख्याकांत आणि दलित महिलांसाठी कोटा असावा अशी मागणी सपा नेते मुलायमसिंग यादव आणि राजदचे लालूप्रसाद यादव यांनी लावून धरली. त्यांच्या घोषणा-बाजीमुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. राज्यसभाही याच गोंधळामुळे स्थगित झाली. पण दरम्यान विधेयक विरोधकांसाठी एक समाधानकारक घोषणा प्रणव मुखर्जी यांनी केली.
महिला आरक्षण विधेयकासंबंधीच्या चर्चेला प्रत्युत्तर देताना त्यांनी सरकारची सामंजस्याची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, अत्यंत ऐतिहासिक अशा या विधेयकावर सर्वपक्षीय बैठक घ्यायला काहीच हरकत नाही, किंबहुना सर्व पक्षांचे मत जाणून घेण्याचे पंतप्रधान डॉ. सिंग यांनी पूर्वीच म्हटले आहे. त्यामुळे सर्व शंका-कुशंका, मतभेद दूर होवू शकतील.
इकडे मुलायमसिंग, लालू आणि शरद या यादव त्रिकुटाने प्रणव मुखर्जींची भेट घेतली. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे शरद पवार, द्रमुकचे नेते टी. आर. बालू या बैठकीला उपस्थित होते. विधेयकाबद्दलची मतमतांतरे पाहून केंद्र सरकारने नरमाईची भूमिका घेतल्याचे बोलले जाते. विधेयक विरोधकांशिवाय कॉंग्रेस-भाजपचेही सदस्य विधेयकाबद्दल पूर्ण समाधानी नाहीत. तृणमूल कॉंग्रेसही या विधेयकाच्या विरोधात मत दिले होते. त्यामुळे आता लोकसभेत विधेयक मंजुरीच्यावेळी केंद्राने सर्वपक्षीय चर्चेची नरमाईची भूमिकाघेतली आहे.

सोनिया महान नेत्या : स्मिता ठाकरे
मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्नुषा स्मिता ठाकरे यांनी आज युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची तोंड भरून स्तुती केली. त्या म्हणाल्या, राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकाला जे प्रचंड बहुमत मिळाले आहे, त्यामागे सोनिया गांधी यांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत,  यात शंकाच नाही. मी सोनियांची प्रशंसक आहे. सोनिया महान नेत्या आहेत. मी त्यांचा खूपच सन्मान करते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: