Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
...आणि संत तुकारामांच्या ओठातून सरस्वती वाहू लागली
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:16 AM (IST)
Tags: regional
रहिमतपूर, दि. 10 (प्रा. श्रीकांत बोधे) : सर्वसामान्य माणसाप्रमाणे संत तुकारामांनी
पूर्ण वयात आपला पिढीजात व्यवसाय सांभाळून नेटकेपणाने संसार केला. उच्च ध्येयाप्रमाणे लागणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात जी फरफट येते तशीच तुकोबांच्या वाट्याला आली. संसाराची परवड झाली. ते विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले. गावातील मंदिरात, भंडाऱ्याच्या डोंगरावर भजन, कीर्तन, नामस्मरणाच्या माध्यमातून अध्यात्मिक साधना
सुरु केली. बाबाजी चैतन्यांकडून त्यांना रामकृष्णहरी या षडाअक्षरी मंत्राचा अनुग्रह झाला. गुरुपदेश झाल्यानंतर ते अनुभूतीची एक एक पायरी चढू लागले. त्यांना काव्यस्फूर्ती झाली. भंडाऱ्याच्या देवळात भक्ताने दिवा लावला आणि तुकोबांच्या उरात वात
पेटली. ओठातून सरस्वती वाहू लागली. पानापानांवर जीव ओतून त्यातून अक्षय अभंगगाथा अवतरली.
निमित्त होते कै. माधवराव शेंडे स्मृती प्रतिष्ठान व रहिमतपूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रहिमतपूर येथे झालेल्या श्री चौंडेश्वरी महोत्सवाचे. संत तुकारामांच्या जीवनावर आधारित योगेश सोमण यांनी सादर केलेल्या आनंदडोह या एकपात्री नाट्यप्रयोगाचे.
या नाट्यप्रयोगाच्या अवघ्या दोन तासाच्या कालावधीत तुकाबाचे घराणे, तुकोबाचा संसार, विठ्ठलभक्तीची आवड, संसारात आलेली संकटे, परमेश्वरी प्राप्तीची तळमळ, परमेश्वर भेटत नाही म्हणून फोडलेला आर्त टाहो, आंतरबाह्य संघर्ष, कठोर आत्मपरीक्षण, परमेश्वरी भांडण, साक्षात्कार झाल्यानंतर झालेला आनंद, तुकोबाच्या जीवनाचा झालेला कायापालट, आनंद तरंग होवून राहिलेले तुकाराम, वैष्णवाविषयी आपुलकी, मेध वृष्टीने उपदेश करणारे तुकाराम या साऱ्या मोजक्या घटना प्रसंगातून तुकोबाचा जीवन प्रवास उभा राहिला.
तुकारामांचे प्रसादपूर्ण व भक्तीरस परिलुप्त कवित्व रामेश्वर भटांना पाहवेना म्हणून त्यांचे समाधान करण्याकरता तुकारामांनी आपली अभंगगाथा इंद्रायणीत बुडवली आणि तुकाराम काठावरच्या झाडाखाली बसले. विठ्ठलाने तेरा दिवस आपल्या भक्ताची परीक्षा घेतली. तेरा दिवस उपवास घडल्याने तुकोबांचा श्वास मंदावला. हालचाल बंद झाली आणि आश्चर्य घडले. विठ्ठलाने साक्षात्कार घडविला. तुकोबाची अभंगगाथा पाण्यावर तरंगू लागली. तुकोबाचे डोळे आनंदाश्रूंनी
वाहू लागले. या प्रसंगाने
उपस्थित रसिक श्रोत्यांचे डोळे पाणवले.
...तर कार्यकर्तृत्व फुलले असते
सोमणांनी या नाट्यप्रयोगात पती-पत्नीच्याच संवादाला व भावनात्मक घटना प्रसंगांना अधिक महत्त्व दिल्याने संत तुकारामांच्या समाजप्रबोधनपर कार्याला योग्य न्याय देता आला नाही. तसे घडले असते तर हे नाटक अधिक प्रभावी होऊन तुकारामांचे कार्यकर्तृत्व अधिकाधिक फुलले असते.
रंगवसंत सरस गीतांनी फुलला
दरम्यान, वसंत ऋतू व विविध सणावर आधारित अंजली मालकर व सहकाऱ्यांनी सादर केलेला रंगवसंत कार्यक्रम एकापेक्षा एक सरस व मधुर गीतांनी फुलला. आला वसंत ऋतू आला, चैतन्याच्या गुंफित माळा। धरतीला नटवित फुलवित, आला वसंत ऋतु आला । या वसंत ऋतु रंगबहार गीताने सारे वातावरण चैतन्यमय झाले. याचबरोबर चिंब चिंब भिजतो आहे, ऋतुराज वनी आला, आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिका जरा जपून जा तुझ्या घरी। या गीतांनी रसिक श्रोत्यांची मनापासून भरभरुन साथ व दाद मिळवली. सारे वातावरण संगीतमय झाले.
नगराध्यक्ष सुनील माने यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेंद्र शेंडे यांनी स्वागत केले. प्रसिध्द निवेदिका विनिता आपटे यांनी निवेदन केले. कार्यक्रमासाठी
सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: