Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोरेगाव, सातारारोड ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 11:30 PM (IST)
निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम; आदर्श आचारसंहिता लागू, दि. 25 एप्रिलला मतदान
कोरेगाव, दि. 11 : संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक दोनची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव ग्रामपंचायतीचा सुधारित निवडणूक कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने दि. 9 मार्च रोजी   एका आदेशान्वये जाहीर केला आहे. कोरेगावबरोबरच सातारारोड, किरूंडे (वाई) ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असून त्यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. दि. 3 एप्रिलपासून 10 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून दि. 25 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दि. 27 एप्रिल रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. 
राज्य निवडणूक आयोगाच्या प्रभारी सचिव रचना नातू यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगातर्फे उपायुक्त बी. आय. केंद्रे यांनी दि. 15 फेबु्रवारी 2010 रोजी एका आदेशान्वये (रानिआ/ग्रापंनि/2010/प्र.क्र.30/का-08) कोरेगाव, सातारारोड आणि किरूंडे (ता. वाई) ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.  या आदेशाबरोबरच आचारसंहिता लागू केली असल्याचे त्यांनी या आदेशात नमूद केले होते. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ सात दिवस उरले असताना राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त बी. आय. केंद्रे यांच्या स्वाक्षरीने आयोगाने एक आदेश काढून त्यात मे आणि जून 2010 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमाला प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात येत असल्याचे नमूद केले होते. कोरेगाव आणि सातारारोड ग्रामपंचायतीची मुदत मे महिन्यात संपत असल्याने या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली होती.
राज्य निवडणूक आयोगाने बुधवार, दि. 9 मार्च रोजी पुन्हा एकदा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 31 जानेवारी 2010 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. मुंबई ग्रामपंचायत (निवडणुका) नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनियम (1) अन्वये नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ दि. 3 एप्रिल ते दि. 10 एप्रिल या दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत ठेवण्यात आली आहे. दाखल झालेल्या नाम-निर्देशनपत्रांची छाननी दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे. दाखल झालेली नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यासाठी दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 ही वेळ ठेवण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यासाठी तसेच निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी दि. 15 एप्रिल रोजी दुपारी 3 नंतर जाहीर केली जाणार आहे. दि. 25 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. दि. 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाणार आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: