|
|
|
महिला आरक्षण विधेयक मंजूर ः साताऱ्यात जल्लोष
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:08 AM (IST)
सातारा, दि. 10 ः आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या दुसऱ्या दिवशी देशातील महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यामुळे साताऱ्यात महिलांनी जल्लोष केला. यावेळी महिलांनी चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटले. राज्यसभेने महिला विधेयकाला मंजुरी दिल्याने महिलांची 25 वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण देऊन राजकारणात त्या सक्षमपणे भूमिका बजावू शकतात हे दाखवून दिले आहे. पुरुषांनीही महिलांना बरोबरीने संधी देऊन समानतेला न्याय दिला आहे. आतापर्यंत केवळ मंदिर झाले होते. आता महिलांना आरक्षण देऊन मंदिराचा कळसही पूर्ण केला आहे. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रजनी पवार, अपर्णा खांडेकर, धनश्री महाडिक, अनुसया कुऱ्हाडे, अलका गुरव, सुलभा चव्हाण, हेमलता किरवे यांनी विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर मोती चौकात फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटले. सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी महिलांनी मोर्चे, निदर्शने आंदोलने केली आणि आज या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे महिलांचा चौदा वर्षाचा संघर्ष संपुष्टात आला आहे. या विधेयकाचे पुढे काय होईल हे माहिती नाही मात्र, आज आमचा विजय झाला आहे. खेड्यापाड्यात सुशिक्षित महिलांनाच लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली पाहिजे. कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रजनी पवार म्हणाल्या, समाजकारणातून राजकारणात आलेल्या अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने समृद्ध इतिहास घडवला आहे. इतिहासाचे पाईक होताना अनेक महिलांनी आपले अस्तित्व पणाला लावले आहे. आरक्षण विधेयक मंजूर झाल्यामुळे महिलांच्या अधिकाराला आता सुवर्णकाळ येणार आहे. त्यापूर्वी राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळाचे लाजिरवाणे प्रदर्शन झाले होते. सभागृह तीनवेळा तहकूब करावे लागले. गोंधळ घालणाऱ्या 7 सदस्यांवर निलंबित करण्याची कठोर कारवाई करण्यात आली. शिवसेनेसह भाजप आघाडीतील सर्व पक्षांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले आहे. दरम्यान बुधवारी कॉंग्रेस कमिटीत झालेल्या कार्यक्रमात राज्यसभेत महिला विधेयक पास करुन 100 व्या महिलादिनाचे औचित्य साधून युपीए सरकारने तसेच सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, ना.पृथ्वीराज चव्हाण व त्यांना सहकार्य करणाऱ्या घटक पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती कदम, एस. टी. आगार वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रमुख रुक्साना मुलाणी, वाहतूक नियंत्रण शाखेच्या अनिता जगताप, आशा मोहाडे, शुभांगी भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. रजनी पवार यांचे भाषण झाले. कार्यक्रमास अपर्णा खांडेकर, नम्रता उत्तेकर, आशा जाधव, धनश्री महाडिक, जयश्री साळुंखे, मीनाताई कांबळे, संजना जगदाळे, कविता धनावडे, सौ. पवार, मुलाणी आदी महिला उपस्थित होत्या. सौ. उत्तेकर यांनी सूत्रसंचालन केले. सौ. निकम यांनी आभार मानले.
फोटो गॅलरी
|