Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चिखली येथे दोन राजकीय गटात सशस्त्र धुमश्चक्री
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:02 AM (IST)
Tags: regional

मसूर, दि. 10 : चिखली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणुकीत विरोधी हनुमान पॅनेलला मदत का केली, असे कारण पुढे करुन शिवारातील पाऊलवाटेचा वाद उफाळून आल्याने चिखली, ता. कराड येथील दोन राजकीय गटात तलवार, गज, काठ्यांनी जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील 13 जण जबर जखमी झाले असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी दोन्ही गटांकडून एकमेकां-विरोधात फिर्यादी दाखल झाल्या असून अटक केलेल्यांना कराड न्यायालयात हजर केले असता 13 मधील आठ जणांना दि. 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी तर 5 जणांना दि. 23 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की चिखली येथील विकास सेवा सोसायटीची निवडणूक सोमवार, दि. 8 मार्च रोजी झाली. या निवडणुकीत विरोधी हनुमान पॅनेलला मतदान करण्यास मदत का केलीस? निवडणुकीत अर्ज का भरलास, या कारणांवरून मारुती शामराव चव्हाण, अर्जुन कृष्णा चव्हाण, भीमराव हणमंत चव्हाण, हणमंत तातोबा चव्हाण, तानाजी विष्णू पवार, श्रीरंग विष्णू चव्हाण, महादेव शंकर चव्हाण, कृष्णा शामराव चव्हाण, संभाजी श्रीरंग चव्हाण, सुभाष हणमंत चव्हाण यांनी संगनमताने तलवार, गज, काठ्यांच्या सहाय्याने हरिभाऊ बाजीराव चव्हाण, भागवत बापूराव चव्हाण, प्रमोद शामराव चव्हाण, संतोष राजाराम चव्हाण यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबतची फिर्याद हरिभाऊ बाजीराव चव्हाण यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात दिली असून संशयित आरोपींपैकी अर्जुन चव्हाण, भीमराव चव्हाण, तानाजी पवार, कृष्णा चव्हाण, राजेंद्र चव्हाण या पाच जणांना कराड न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. 23 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
तसेच शिवारातील पाऊलवाटेच्या कारणांवरून कुंभाराचा मुलगा व संभाजी चव्हाण यांच्यात भांडण झाले, त्याचे पडसाद संबंधित राजकीय गटांवर उमटल्याने महेश धमेंद्र पाटील, चक्रधर राजाराम माने, संतोष राजाराम माने, भाऊसाहेब बंडू चव्हाण, हरिबा बाजीराव चव्हाण, दत्तात्रय शामराव चव्हाण, अरुण गणपती माने, अनिल गणपती माने, अमृत भाऊसाहेब चव्हाण, मच्छिंद्र भाऊसाहेब चव्हाण, सोमनाथ मधुकर कुंभार यांनी संगनमताने मारुती चव्हाण, हणमंत चव्हाण, सुभाष चव्हाण, शिवाजी चव्हाण, संभाजी चव्हाण, हिराबाई चव्हाण, विमल चव्हाण,  सुरेखा चव्हाण, अर्जुन चव्हाण यांना काठ्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केल्याची फिर्याद मारुती शामराव चव्हाण यांनी मसूर पोलिसांत दिली असून चक्रधर माने, संतोष माने, भाऊसाहेब चव्हाण, अरुण माने, अनिल माने, अमृत चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण, सोमनाथ चव्हाण यांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता दि. 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
सदर प्रकरणातील सर्व जखमींवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मसूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. रमेश लोखंडे यांनी उपचार केले. याबाबत दोन्ही गटाने एकमेकांविरोधात मसूर पोलीस दूरक्षेत्रात फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून काहींना काल उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती. अधिक तपास स. पो. नि. हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. एम. बी. शिंदे, हे. कॉ. एल. ए. मुल्ला, ए. आर. नलवडे करीत आहेत.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: