रिक्षाचालकांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी : दोघे गंभीर
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:04 AM (IST)
कराड, दि. 10 : वडाप वाहतुकीच्या पूर्व-वैमनस्यातून रिक्षा आणि ऍपे रिक्षा चालकांच्या दोन गटात दगड, काठ्या व लोखंडी पाईपने झालेल्या तुंबळ हाणामारीत 2 रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास आगाशिवनगर (मलकापूर) येथे घडली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, की चचेगाव आणि मलकापूर येथील रिक्षा चालकांमध्ये वडाप वाहतुकीच्या कारणावरुन यापूर्वी जोरदार धुमश्चक्री झाली होती. त्याचा राग मनात धरुन बुधवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान चचेगाव येथील रिक्षाचालकांनी संगनमतकरुन आगाशिवनगर (मलकापूर) येथील रिक्षाचालकांना बेदम मारहाण केली. या तुंबळ हाणामारीत भास्कर निकम (वय 30) आणि इरफान मुल्ला (वय 21) दोघे रा. आगाशिवनगर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात झाली नव्हती. या घटनेमुळे आगाशिवनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.