Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

कॅथरिन बिगलो
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 10:04 PM (IST)
Tags: vishesh lekh
ऑस्करच्या 82 व्या पुरस्कार सोहळ्यात "द हार्ट लॉकर' या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी कॅथरिन बिगलो हिला "ऑस्कर' पुरस्कार घोषित झाला आणि  साऱ्या जगात ती प्रसिध्दीच्या झोतात आली. ऑस्करच्या इतिहासात दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवणारी ती पहिली महिला दिग्दर्शक! "दि हार्ट लॉकर', या युध्दपटाचं उत्कृष्ट दिग्दर्शन तिनं केलं तेव्हा, या चित्रपटाला ऑस्करचा पुरस्कार मिळेल, असं हॉलिवूडच्या ख्यातनाम निर्माते आणि दिग्दर्शकांनाही वाटलं नव्हतं. हा चित्रपट पूर्ण झाल्यावरही, त्याला कुणी वितरक मिळत नव्हता. कारण जेम्स कॅमरोन यानं दिग्दर्शित केलेल्या "अवतार', याच चित्रपटाचा जगभर बोलबाला होता. तब्बल 250 कोटी डॉलर्स खर्च करुन तयार केलेल्या या चित्रपटानं प्रचंड उत्पन्नही मिळवलं. पण, हा चित्रपट काही ऑस्करमध्ये पहिला क्रमांक मिळवू शकला नाही. अनपेक्षितपणे "द हॉर्ट लॉकर' ने मात्र दिग्दर्शन, निर्मिती, पटकथा, यासह सहा पुरस्कार मिळवले.
अमेरिकेनं इराकमध्ये युध्द सुरु केलं तेव्हा तिथं युध्द वार्ताहार असलेल्या क्रिस हेजनं या चित्रपटाची पटकथा लिहिली. पण,  दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या हॉलिवूडमधल्या एकाही कंपनीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन करायची तयारी दाखवली नाही. बिगलो धाडसानं पुढं आली. तिनं दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसाही घातला. या चित्रपटातले कलाकारही ख्यातनाम नाहीत. तरीही तिनं निर्धारानं सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला. इराक जवळच्याच जॉर्डनच्या रखरखत्या वाळवंटात तिनं या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं. इराकमधल्या युध्दात बॉंब निकामी करणाऱ्या पथकाला आपल्या जिवाची पर्वा न करता, बॉंब निकामी करताना कोणती जोखीम घ्यावी लागते, याचं जिवंत चित्रण तिनं केलं. या पथकातल्या सैनिकांची व्यथाही तिनं अचूक टिपली. हा चित्रपट पूर्ण झाल्यावर तो प्रदर्शित करायसाठी वितरकही पुढे आले नाहीत. हा चित्रपट चालणार नाही, असंच वितरकांचंही मत होतं. पण आता मात्र या चित्रपटाला साऱ्या जगभर प्रचंड मागणी येते आहे.
वयाच्या 58 व्या वर्षी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नवा इतिहास घडवणाऱ्या बिगलोचे वडील पेंटिंगच्या कारखान्यात  व्यवस्थापक होते. आई ग्रंथपाल होती. तिला बालपणापासूनच चित्रकलेचं विलक्षण वेड होतं. सॅन फ्रॅन्सिस्को मधल्या आर्ट इन्स्टिट्यूटमधून तिनं चित्रकलेचं शिक्षण घेतलं. पण तिला चित्रपटाचं क्षेत्र खुणावत होतं. कोलंबिया विद्यापीठातून चित्रपट समीक्षेची पदवी घेतल्यावर, तिनं लघुपटांचं दिग्दर्शन सुरू केलं. 1978 मध्ये "सेट अप' हा तिनं दिग्दर्शित केलेेला पहिला माहितीपट अवघ्या वीस मिनिटांचा होता. ब्लू स्टिल, लव्हलेस या चित्रपटाबरोबरच तिनं वाईल्ड पाम्स या दूरदर्शन मालिकेचंही दिग्दर्शन केलं. अवतार चित्रपटाचा दिग्दर्शक जेम्स कॅमरोन याच्याशी 1989 मध्ये तिचा विवाह झाला. पण तो दोनच वर्षे टिकला. त्याच कॅमरोनच्या "अवतार', चित्रपटावर मात करीत तिनं जगातलं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पारितोषिक पटकावलं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शताब्दी वर्षात बिगलोनं घेतलेली ही आकाश भरारी महिलांना प्रेरणा देईल.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: