लोकनेत्यांच्या प्रेरणेनेच सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करत राहिलो : आ. विक्रमसिंह पाटणकर
ऐक्य समूह
Thursday, March 11, 2010 AT 12:15 AM (IST)
पाटण, दि. 10 : लोकनेत्यांचे व्यक्तिमत्व अस्सीम होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्याकडून आपल्यालाही वैचारिक बैठक व विकासाची दृष्टी लाभली. राजकीय जीवनामध्ये लोकनेत्यांनी दिलेली विकासाची दृष्टी हीच शिदोरी समजून गेली 40 वर्षे सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासकामे पोहोचविण्याचा प्रयत्न केला. लोकनेत्यांच्या प्रेरणेनेच सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून त्या जनतेसाठीच कार्य करत राहिलो, असे प्रतिपादन आ. विक्रमसिंह पाटणकर यांनी केले.
येथील बचतभवनमध्ये जिल्हा परिषद व पाटण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी तात्यासाहेब दिवशीकर, हरीभाऊ घोडे, राजाभाऊ शेलार, हिंदूराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर आदी उपस्थित होते.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पाटण पंचायत समिती येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या चित्ररथाच्या मिरवणुकीचा शुभारंभ शिक्षण सभापती ऍड. भास्करराव गुंडगे व पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. चित्ररथाच्या मिरवणुकीमध्ये पाटण पंचायत समिती, दादासाहेब पाटणकर हायस्कूल, कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल, मराठी मुलांची शाळा पाटण, घोट, किल्लेमोरगिरी, वेखंडवाडी, दाढोली, चाफळ, मरळी, मल्हारपेठ, कारवट, कोयना, नाटोशी, केरा, ढेबेवाडी, तारळे, हेळवाक, मेष्टेवाडी, तळमावले बिटातील चित्ररथांचा सहभाग होता. अत्यंत आकर्षक चित्ररथांमुळे
प्रेक्षक आकर्षित झाले होते. लोकनेत्यांचा जयघोष, सर्व विद्यालयांचे लेझीम पथक, झांजपथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते. शिक्षण विभागामार्फत चलत चित्ररथ उभारण्यात आला होता. पाटण पंचायत समिती कार्यालयापासून मुख्य रस्त्याने चित्ररथांची मिरवणूक काढण्यात येवून नवीन बसस्थानकासमोरील बचतभवन येथे आल्यानंतर तिचे विसर्जन करण्यात आले.
लोकनेते बाळासाहेब देसाई जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त पाटण पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी व शिक्षकांच्यासाठी घेतलेल्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाबरोबर लोकनेत्यांच्या प्रतिमेचे पूजन असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी पंचायत समितीच्या सभापती सौ. पूजाताई कदम यांनी
उपस्थितांचे स्वागत केले. उपसभापती रमेश मोरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात लोकनेत्यांच्या व्यक्तिमत्वांचे विविध पैलू विशद केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. श्रीधर साळुंखे यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व. श्रीमंत रणजितसिंह तथा दादासाहेब पाटणकर यांच्यातील असलेले जिव्हाळ्याचे व प्रेमाचे नाते त्याचबरोबर स्व. दादासाहेब यांनी लोकनेत्यांना त्यांच्या राजकीय जीवनात निवडणुकीच्याप्रसंगी केलेल्या सहकार्याची आठवण करून दिली. विद्यमान आ. विक्रमसिंह पाटणकर हे देखील लोकनेत्यांच्या अत्यंत निकट होते. कारखान्याच्या उभारणीत, कोयना काठावर उभ्या राहिलेल्या जलसिंचन योजनांच्या उभारणीत लोकनेत्यांनी अत्यंत विश्वासाने त्यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. आ. विक्रमसिंह पाटणकर यांनी सातत्याने लोकनेत्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली होती. ते जेव्हा जनता दलामध्ये गेले. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी पाठ फिरविली. मात्र आ. पाटणकर यांनी त्याही परिस्थितीत लोक-नेत्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला, हा इतिहास कोणी पुसू शकणार नाही. आ. विक्रमसिंह पाटणकर हेच त्यांचे राजकीय व विकासकामांचे वारसदार असून देसाई-पाटणकर घराण्यात पूर्वीपासून आपुलकीचे नातेच होते हे दिसून येते. या दोन्ही घराण्याच्या योगदानातूनच पाटण तालुक्यात विकासकामे उभी राहिली. मात्र अलिकडे हे चित्र बदलले आहे. लोकनेत्यांचे व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी व त्यांचा विशाल दृष्टीकोन जनतेसमोर मांडण्यासाठी विधायक, वैचारिक बैठक हवी. येथील सर्वसामान्य जनतेचे स्वप्न निश्चित कोण पूर्ण करू शकेल, याची जाणीव लोकनेत्यांना असल्यामुळेच त्यांनी आ. विक्रमसिंह पाटणकर यांच्यावर प्रसंगानुरूप जबाबदारी सोपविली, याची येथील जनताच साक्षीदार आहे.
हिंदुराव पाटील म्हणाले, महाराष्ट्राला ललामभूत ठरेल असे लोकनेत्यांचे व्यक्तिमत्व होते. सत्तेचा वापर त्यांनी सदैव सर्वसामान्य जनतेसाठी केला. वेळप्रसंगी कायदा बदलून जनतेला न्याय दिला. जीवघेण्या भूकंपाच्यावेळी त्यांनी जनतेचे अश्रू पुसण्यासाठी महाराष्ट्राची जबाबदारी दूर ठेवून पाटण येथे ठाण मांडले. जगातून मदतीचा ओघ त्यांनी पाटणमध्ये आणला. सर्वसामान्यांसाठी असणारी त्यांची आस्था त्यांनी आपल्या कर्तबगारीतून व क्षमतेतून दाखविली. त्यामुळेच जनतेने त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. लोकनेते हे पाटण तालुक्यातील तमाम जनतेच्या आदर व प्रेमाची ज्योत होती.
राजाभाऊ शेलार म्हणाले, लोकनेत्यांच्या सहवासात आपल्याला काम करायला मिळाले नाही याची खंत आजही असली तरी त्यांच्याबद्दल प्रचंड आदराची भावना आहे. कणखर बाण्याचा व करारी वृत्तीचा माणूस म्हणून त्यांची अढळ प्रतिमा आपल्या मनात वास करते. त्यांनी त्यांच्या कार्यकालात घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाचा उभ्या महाराष्ट्राला लाभ झाला. पाटणच्या मातीतील या भूमीपुत्राचे कार्य कोणीही कधीच विसरू शकणार नाहीत.
25 लाखाचा निधी उभारू
आ. पाटणकर म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या आशिर्वादानेच आपण राजकारणात आलो. पाटण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी लढविलेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना आपण पाठिंबा दिलाच पण बिनविरोध निवडून आणण्यासाठी देखील पुढाकार घेवून स्व. भडकबाबांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त केले. लोकनेत्यांच्या बिनविरोध निवडीसाठी मला पाटणकर कुटुंबियांतील घटकांशी प्रचंड संघर्ष करावा लागला, हे सत्य आजही लपून राहिले आहे याची मला खंत वाटते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी शिक्षणक्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात क्रांती घडविली. पाटण तालुक्यातील शिक्षकांनी याची जाणीव ठेवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य प्रामाणिकपणे करून भावी पिढी घडवावी. पाटण येथे कोयना शिक्षण संस्थेने लोकनेत्यांच्या नावाने महाविद्यालय सुरू करून त्यांचे चिरंतन स्मारक उभे केले आहे. या भव्य वास्तूस 25 लाख रुपयांचा निधी उभा करून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी स्वातंत्र्यवीर पंचायत समितीचे माजी सभापती हरीभाऊ घोडे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास बाबुराव सुतार, कृष्णराव भिसे, राजाभाऊ काळे, मधुकर चव्हाण, शिवाजीराव पाटील, प्रल्हादराव माने, राजेंद्र साळुंखे, शामराव भोळे, रंगराव जाधव, सौ. रेखाताई पाटील, सौ. वनिता साळुंखे, सौ. विजयाताई पाटील, सौ. भारती सुतार, सौ. शालन जाधव, सौ. पुष्ताताई जाधव, नथुराम मोरे, मधुकर पाटील, ए. आर. पाटोळे, टी. एस. पाटील, डॉ. दीपक साळुंखे, एस. ए. बारटक्के, उत्तमराव देसाई, काशिनाथ उदुगडे, राजकुमार चव्हाण, शिवाजीराव खामकर, सुभाषराव पवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, विकास अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.