Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

रंगपंचमीची अशीही शिक्षा!
वासुदेव कुलकर्णी
Thursday, March 11, 2010 AT 10:03 PM (IST)
Tags: lolak

 उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा केव्हाच वाजले. आपल्यावरच्या अन्यायाची दाद मागायसाठी पोलीस ठाण्याची पायरी चढाईचे धाडस या राज्यातल्या गोरगरीबांना होत नाही. पोलीस ठाण्यात गेल्यास, पोलीस तक्रार ऐकण्याऐवजी, तक्रार करायला गेलेल्या लोकांनाच दमात घेतात. फक्त मायावती आणि त्यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांचे, पक्षाच्या नेत्यांचे तेवढेच आदेश ऐकायचे, असा या पोलीस खात्याचा खाक्या! उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रिटा चौधरी यांच्या लखनौमधल्या अतिसुरक्षित भागातल्या सरकारी बंगल्याला  सत्ताधारी पक्षाच्याच गुंडांनी आग लावली. हा बंगला जळून खाक होईपर्यंत, राजनिष्ठ पोलीस त्या बाजूला फिरकलेही नाहीत. ते घटनास्थळी पोहोचल्यावरही गुंडांचा हैदोस सुरुच होता. आपले आग लावायचे काम पूर्ण झाल्यावर, ही टोळी शांतपणे पोलिसांच्यासमोरच निघून गेली. या घटनेचा साऱ्या देशभर प्रचंड गाजावाजा झाला. मायावतींच्यावर टिकेची झोड उठली. पोलिसांनी चौकशी केली, पण त्यात काय निष्पन्न झाले, हे मात्र गूढच राहिले. रिटा बहुगुणांनी तर मायावतींच्या आदेशानेच आपला बंगला पेटवल्याचा जाहीर आरोपही तेव्हा केला होता.
विरोधी पक्षातल्या दिग्गज नेत्यांची अशी अवस्था असल्यावर, सामान्यांना हे पोलीस खाते कशी वागणूक देत असेल, हे सांगायचेही कारण नाही. मायावती आणि त्यांच्या प्रतिष्ठेला जपायसाठी हेच पोलीस खाते अत्यंत जागरूक असते. बहेनजींची आपल्यावर खप्पा मर्जी होवू नये, यासाठी पोलिसांपासून ते पोलीस महासंचालकांपर्यंत सारेच त्यांच्यासमोर जी जी करीत, माना तुकवित असतात. मायावतींच्या सत्तेचा दरारा आणि दबदबा राज्यात राहिलाच पाहिजे, यासाठी हे पोलीस खाते अत्यंत दक्ष आहे. उत्तर भारतात होळीच्या दिवशीच रंगपंचमी साजरी होते. हा पारंपरिक सण लखनौमध्येही उत्साहाने साजरा झाला. आबालवृध्दांनी, तरुण तरुणींनी रंगपंचमीचा आनंद लुटला. रंगात परस्परांना आंघोळी घातल्या. रंगपंचमीचा उत्साह असा ऐन भरात आला असतानाच, या शहरातल्या सैनिक स्कूलमध्ये बारावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी, भिंतीवरच्या मायावतींच्या पोस्टरवर रंग फेकला. झाले! बंदोबस्तासाठी तिथे असलेल्या पोलिसांचे आणि अधिकाऱ्यांचे पित्त खवळले. बहेनजींच्या पोस्टरवर रंग फेकणे म्हणजे, केवढा घोर गुन्हा! त्यांनी या चारही पोरांची गठडी वळली. बेदम मारहाण केली. त्यांच्या रंगपंचमीचा असा बेरंग झाला. बहेनजींच्या पोस्टरवर रंग फेकता काय? तुम्हाला जन्मभर धडा मिळेल, अशीच शिक्षा मिळेल, अशा धमक्या या पोलिसांनी दिल्या. आमची चार मार्चपासून वार्षिक परीक्षा सुरू आहे, आम्ही आमची चूक मान्य करतो, आम्हाला माफ करा, अशा गयावया या विद्यार्थ्यांनी करूनही सत्तेची मस्ती चढलेल्या या मग्रूर पोलीस अधिकाऱ्यांना त्यांची काही दया आली नाही. पोलीस कोठडीतूनच, पोलीस बंदोबस्तात या चार पोरांना परीक्षेसाठी पाठवले गेले. या साऱ्या घटनेचा जाहीर पंचनामा उपग्रह वाहिन्यांनी केल्यावरही, पोलिसांची मस्ती काही कमी झाली नाही. या विद्यार्थ्यांना जामिनावर सोडायला नकार देत, त्यांना बालसुधारगृहात डांबण्यात आले.
या विद्यार्थ्यांना न्यायालयासमोर उभे केल्यावर मात्र, न्यायाधिशांनी असा अति आगाऊपणा करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि पोलिसांना धारेवर धरले. अजाणतेपणी मुलांनी मायावतींच्या पोस्टरवर रंग फेकला, हा काही त्यांचा गुन्हा नव्हे. समज देऊन त्यांना का सोडले नाही? असा सवाल न्यायाधिशांनी केला, तेव्हा पोलिसांची बोबडी वळली. न्यायाधिशांनी या विद्यार्थ्यांना निर्दोष मुक्त केले.
एवढा तमाशा होईपर्यंत बहेन मायावती मूग गिळून गप्प होत्या. प्रसारमाध्यमांनी त्यांच्या पोलिसांची दंडेलशाही चव्हाट्यावर आणल्यावर, त्यांना कंठ फुटला. पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर अशी कडक कारवाई करायला नको होती, असे नक्राश्रू त्यांनी गाळले. पण गरीबांच्या सुख- दु:खाशी काहीही देणे-घेणे नसलेल्या मायावतींचा हाही ढोंगीपणाच असल्याने, जनतेची नाराजी काही दूर होणारी नाही.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: